अनिता इटुबोणे यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:36+5:302021-05-01T04:16:36+5:30
संगणक परिचालकांचे मानधन रखडले कुंटूर : नायगाव तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या ४० संगणक परिचालकांचे मानधन तीन ते चार महिन्यांपासून मिळाले ...

अनिता इटुबोणे यांना पदोन्नती
संगणक परिचालकांचे मानधन रखडले
कुंटूर : नायगाव तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या ४० संगणक परिचालकांचे मानधन तीन ते चार महिन्यांपासून मिळाले नाही. येत्या पाच तारखेपर्यंत मानधन मिळाले नाही तर कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव पाटील यांनी दिली. मानधनाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दोनवेळा बोलणे झाले. त्यांनीही पाठपुरावा केला. मात्र, जिल्हा परिषदेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे मानधन मिळण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात येते.
भीमजयंती साजरी
लोहा : तालुक्यातील जोमेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भास्करराव पाटील जोमेगावकर, चेअरमन दिगंबर शिंदे, प्रभाकर शिंदे, प्रकाश भुरे, ग्रामपंचायत सदस्य पंडित कापसे, ग्रामसेवक पांडुरंग श्रीरामवार, मुख्याध्यापक विलास नाईक, विलास भुरे, मनोहर भुरे, रमेश भुरे, मधुकर पवार, गौतम भुरे, वसंत भुरे, आदी उपस्थित होते.
हनुमान जयंती साजरी
मुखेड : मंगळवारी शहर व खेड्यापाड्यात विविध हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीचे कार्यक्रम पार पडले. यावेळी कोरोनामुळे केवळ पूजाअर्चा आणि गुलालांचा कार्यक्रम घेऊन जन्मोत्सव साजरा झाला. अनेक भाविकांनी मंदिर बंद असले तरी मंदिरासमोर, घरात हनुमानांच्या प्रतिमेसमोर नारळ फोडून जन्मोत्सव सोहळा साजरा केला.
रक्तदान शिबिर
घुंगराळा : तालुक्यातील घुंगराळा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. राष्ष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे-पाटील यांनी हा कार्यक्रम घेतला. उद्घाटन जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी केले. यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, राष्ट्रवादीचे भास्करराव भिलवंडे, कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक पठाण, जिल्हा सरचिटणीस डी. बी. जांभरुणकर, प्रदेश सचिव बाळासाहेब भोसीकर, आदी उपस्थित होते.
वीज तारांमुळे कडबा जळाला
बिलोली : बिलोली तालुक्यातील आळंदी येथे कडबा भरून जाणाऱ्या टेम्पोला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागली. यात कडबा जळाला. टेम्पो (एम.एच.०४- एफ.क्यू.४६३१)नांदेडकडे जात असताना ही घटना घडली. चालकाने सावधगिरीने रस्त्याच्या कडेला पाणी असलेल्या खड्ड्यात टेम्पो उभा केल्याने पुढील अनर्थ टळला.
प्रत्येकाने लस घ्यावी
किनवट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने लवकरात लवकर प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन माजी आ. प्रदीप नाईक यांनी केले. लस आवश्यक आहे, केवळ लसीकरणामुळेच जीवन पूर्वपदावर येईल, त्याशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले.
पाणीटंचाईच्या झळा
अर्धापूर : तापमानात वरचेवर वाढ होत असताना पाण्याची पातळी खालावत चालली आहे. विहिरी व बोअरवेलचेही पाणी कमी झाले. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तसेच जनावरांनादेखील पिण्याचे पाणी मिळत नसल्याने हाल होत आहेत.
जयश्री जोंधळे सेवानिवृत्त
कंधार : तालुक्यातील मानसपुरी येथील जि. प. प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जोंधळे ३० एप्रिलला सेवानिवृत्त झाल्या. यापूर्वी त्यांनी ठिकठिकाणी शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली होती. १९९७ मध्ये कंधार पालिकेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. २००५ मध्ये जि. प. नांदेडच्या वतीने त्यांना गाौरविण्यात आले होते.
मानधन तत्काळ द्या
बिलोली : नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत अंगणवाडी शिक्षिका, शिक्षक, रोजगार सेवक यांनी बीएलओचे काम पार पाडले. दोन वर्षांपासून बीएलओंना शासकीय मानधन मिळाले नाही. या संदर्भात भाकप व जनसंघटनेच्या वतीने राष्ष्ट्रीय सचिव काॅ. प्रा. सदाशिव भुयारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले.
गावठी दारू जप्त
मुखेड : तालुक्यातील दापका गुंडोपंत येथे दोन ठिकाणी छापे टाकून ३ हजार ८०० रुपयांची गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी गावठी दारू बाळगून होते. जमादार माधव कागणे यांनी फिर्याद दिली.
किरोडा येथे जयंती साजरी
लोहा : येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या किरोडा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. माजी सरपंच कंठीराम पाटील, नंदू पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंदा धुंडे, दीपक जोंधळे, मोहन जोंधळे, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट
माळाकोळी : जिल्हाधिकारी विपीन इटणकर आणि पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी २९ एप्रिल रोजी चोंडी (ता. लोहा) येथे भेट देऊन ढवळे कुटुंबीयाशी चर्चा केली. घटनेची सखोल चाैकशी करून पीडित कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू सोनाळे, राहुल चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन दिले.