खाजगी रुग्णालयांनी २९ लाख रुपये केले रुग्णांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:30+5:302021-06-09T04:22:30+5:30

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एका एप्रिल महिन्यात तब्बल ३५ हजार रुग्ण आढळले होते, तर ७५० मृत्यूही झाले होते. कोरोना ...

Private hospitals return Rs 29 lakh to patients | खाजगी रुग्णालयांनी २९ लाख रुपये केले रुग्णांना परत

खाजगी रुग्णालयांनी २९ लाख रुपये केले रुग्णांना परत

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एका एप्रिल महिन्यात तब्बल ३५ हजार रुग्ण आढळले होते, तर ७५० मृत्यूही झाले होते. कोरोना रुग्णांसाठी शहरात जिल्हा रुग्णालय, विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालय तसेच आयुर्वेद रुग्णालयात उपचाराची सोय होती. त्याचवेळी प्रशासनाने शहरातील ४१ खाजगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी दिली होती. या रुग्णालयातील बेडही दुसऱ्या लाटेत फुल्ल झाले होते. परिणामी रुग्णालयाची मनमानी मोठ्या प्रमाणात झाली. बिलेही अवाच्या सव्वा आकारण्यात आली. ही बाब लेखापरीक्षणातही स्पष्ट झाली आहे.

या जादा देयक आकारणाऱ्या रुग्णालयांना ना जिल्हा प्रशासनाने ना महापालिकेने नोटीस बजावली आहे. केवळ लेखापरीक्षणानंतर ही रक्कम रुग्णांना परत मिळाली, असे गृहीत धरण्यात आले आहे. याबाबत विचारणा केली असता काही रुग्णांनी लेखापरीक्षणानंतर बिल अदा केले, अशी सारवासारवही करण्यात आली.

सर्वाधिक तफावत ही सारिया कोविड हॉस्पिटलच्या देयकात आढळली. येथे ६ लाख ९३ हजार १७९ रुपये जादा आकारण्यात आले होते. त्याखालोखाल रेणुकाई क्रिटिकल केअर सेंटर ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने ३ लाख १९ हजार ८०० रुपये जादा आकारले आहे. श्री समर्थ हॉस्पिटलने १ लाख ८७ हजार ५००, उमरेकर हॉस्पिटलने १ लाख ५२ हजार २५०, व्हिजन हॉस्पिटलने १ लाख ४३ हजार १०० रुपये, अपेक्षा क्रिटिकल केअर सेंटर ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने २ लाख १५ हजार ४०० रुपये, काकांडीकर हॉस्पिटलने १ लाख ८३ हजार ४०० रुपये, मॅक्स डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलने १ लाख ८९ हजार १०० रुपये, लोटस डेडिकेट कोविड हॉस्पिटलने १ लाख ४३ हजार रुपये, भगवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने १ लाख ३९३ रुपये, आशा हॉस्पिटलने १ लाख १९ हजार १०० रुपये तसेच आधार हॉस्पिटलने १ लाख २२ हजार १७९ रुपये जादा आकारले होते.

कोरोना संकटात रुग्णांना उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयांनाही कोरोनावर उपचार करण्याची परवानगी दिली होती. महापालिकेमार्फत ही परवानगी देण्यात आली होती. ज्यादा बिलाच्या तक्रारीनंतर सर्वच रुग्णालयांनी दिलेल्या देयकांचे ऑडिट करण्यात आले. आकारलेली ज्यादा रक्कम रुग्णांना तात्काळ परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश रुग्णांना ही रक्कम परत मिळाली आहे. डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड

Web Title: Private hospitals return Rs 29 lakh to patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.