मुखेड, मुक्रमाबाद (जि. नांदेड) : पोटाची खळगी भरण्यासाठी कुवेतला गेलेल्या मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील शेख जुबेर महंमद (वय ३०) या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी केंद्र सरकार आणि भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी आर्त साद मृताच्या वडिलांनी घातली आहे.
शेख जुबेर हा मागील चार वर्षांपासून कुवेतमधील अल झहार येथे कूक म्हणून कार्यरत होता. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजता त्याने आपल्या वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जुबेरच्याच फोनवरून कुवेत पोलिसांनी त्याच्या वडिलांना संपर्क केला आणि तुमचा मुलगा जळून मेला आहे, अशी धक्कादायक माहिती दिली.
जुबेरचे लग्न जमले असून, घरी त्याच्या लग्नाची लगबग सुरू होती. अशा परिस्थितीत तो टोकाचे पाऊल उचलूच शकत नाही, असा विश्वास वडिलांनी व्यक्त केला आहे. कुवेत पोलिसांशी बोलताना वडील शेख महंमद यांनी माझा मुलगा आत्महत्या करू शकत नाही, त्याला कोणी तरी मारले आहे, असे ठणकावून सांगताच, पोलिसांनी फोन बंद केल्याची माहिती समोर आली आहे. या विसंगतीमुळे हा प्रकार घातपाताचा असावा, अशी शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. मृत जुबेरच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील गावातच एक छोटे किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. तरुण मुलाच्या अशा जाण्याने पूर्ण बिहारीपूर गावावर शोककळा पसरली आहे.
भारतीय दूतावासाकडे दादजुबेरचे वडील शेख महंमद इमामसाब यांनी भारतीय दूतावास (कुवेत) यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविले आहे. या निवेदनात त्यांनी घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील युवकाचा कुवेतमध्ये मृत्यू झाल्याबाबत केंद्र शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.- माधव मलगीरवार, गोपनीय विभागप्रमुख, मुक्रमाबाद पोलिस ठाणे.
Web Summary : An Indian man from Biharipur, working in Kuwait, died suspiciously. His family alleges murder, appealing for investigation. He was preparing for his wedding.
Web Summary : कुवैत में बिहारिपुर के एक भारतीय व्यक्ति की संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई। परिवार ने हत्या का आरोप लगाया है, जांच की अपील की है। वह अपनी शादी की तैयारी कर रहा था।