Pregnant women sonography refusal at a government hospital of Vishnupuri | शासकीय रुग्णालयात प्रसूतीपूर्व सोनोग्राफीस नकार
शासकीय रुग्णालयात प्रसूतीपूर्व सोनोग्राफीस नकार

ठळक मुद्देमरणकाळ भोगत महिला जातात खाजगी केंद्रात आर्थिक दुर्बल रुग्णांना खाजगीत मोजावे लागतात हजारो रुपये

- शिवराज बिचेवार

नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रामध्ये फक्त अत्यावश्यक महिला रुग्णांचीच सोनोग्राफी करण्यात येते़ प्रसूतीपूर्व सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांना थेट बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो़ त्यामुळे पोटात बाळ घेवून मोठी कसरत करीत या महिलांना तपासणीसाठी खाजगी केंद्र गाठावे लागते़ तपासणीचे अहवाल अन् डॉक्टरांच्या वेळा यामध्ये दोन ते तीन दिवसांचा कालावधी निघून जातो़ त्यामुळे गर्भवती महिलांना मरणकळा सोसण्याशिवाय पर्याय राहत नाही़ 

सुपर स्पेशालिटी प्रस्ताव पाठविणाऱ्या डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आजही अनेक विभाग पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाहीत़ या ठिकाणी नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, शेजारी आंध्र आणि कर्नाटक राज्यातून उपचारासाठी दररोज हजारो रुग्ण येतात़ रुग्णायालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज साधारणता १३०० ते १४०० तर आंतररुग्ण विभागात २५० रुग्ण दाखल होतात़ त्यामुळे रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यातच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय असते़ सिझेरियनपेक्षा या ठिकाणी नॉर्मल प्रसूती करण्यावर या ठिकाणी अधिक भर देण्यात येतो़ हेही त्यामागचे प्रमुख कारण आहे़ परंतु प्रसूती विभागात असलेल्या खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे बहुतांश वेळा एका खाटेवर दोन रुग्णांना उपचार घेण्याची वेळ येते़

त्यात बाळ सोबतच असल्याने अधिकच गैरसोय होते़ या ठिकाणी असलेल्या सोनोग्राफी केंद्रात साध्या सोनोग्राफी होत असल्या तरी, गर्भवती महिलांना मात्र सोनोग्राफीसाठी खाजगी केंद्रच गाठावे लागते़ त्यामागे सोनोग्राफीसाठी असलेली प्रचंड वेटींग हे ही प्रमुख कारण आहे़ त्याचबरोबर केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून या महिलांना थेट खाजगी केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात येतो, अशाही तक्रारी आहेत. त्यामुळे अवघडलेल्या अवस्थेत या महिलांना सोनोग्राफीच्या तपासणीसाठी खाजगी केंद्र गाठावे लागते़ खाजगी केंद्रात साध्या सोनोग्राफीसाठी एक हजार रुपये तर कलर डॉपलरसाठी दोन हजार रुपये मोजावे लागतात़ रुग्णालयाबाहेरच असलेल्या केंद्राचे मात्र त्यामुळे फावत आहे़ त्यामुळे या ठिकाणी सर्वच गर्भवती महिलांची तपासणी होणे गरजेचे आहे़

५०८ खाटांवर ७५० रुग्ण
रुग्णालयात ५०८ खाटांची मंजूरी आहे़ परंतु प्रत्यक्षात रुग्णांची संख्या ही ७५० पेक्षा अधिक असते़ त्यामुळे एका खाटावर दोन रुग्णांना उपचार घेण्याची वेळ येते़ त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांची संख्याही मोठी असते़ आजघडीला रुग्णालयात २४६ चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत़ प्रत्यक्षात मागणी ही ५२० कर्मचाऱ्यांची आहे़ त्यामुळे अद्यापही या ठिकाणी २५० हून अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे़ त्याबाबत अनेकवेळा प्रस्ताव पाठवूनही त्याला मंजूरी मिळाली नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने आंतररुग्ण विभागाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे़ येत्या काही दिवसात बाह्य रुग्ण विभाग आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़ सध्याचा कंत्राटदार वर्षभर राहणार आहे़ सध्या तरी, त्यांचे काम समाधानकारक आहे़ दररोज रुग्णालयातील स्वच्छतेचा आढावा घेण्यात येत आहे़ अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ़वाय़एच़चव्हाण यांनी दिली़ 

Web Title: Pregnant women sonography refusal at a government hospital of Vishnupuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.