लोकसंख्या ३३ लाखांवर बसेस फक्त ५६०

By Admin | Updated: May 25, 2014 01:13 IST2014-05-25T01:08:22+5:302014-05-25T01:13:13+5:30

श्रीनिवास भोसले, नांदेड जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागामध्ये जवळपास एक हजार बसेस वाढविण्याची गरज आहे़

Population of 33 lakh buses is only 560 | लोकसंख्या ३३ लाखांवर बसेस फक्त ५६०

लोकसंख्या ३३ लाखांवर बसेस फक्त ५६०

श्रीनिवास भोसले, नांदेड जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागामध्ये जवळपास एक हजार बसेस वाढविण्याची गरज आहे़ परंतु आजघडीला ३३ लाख ५६ हजार लोकसंख्येसाठी केवळ ५६० बस रस्त्यावर धावत आहेत़ जिल्ह्यात महामंडळाकडून एकूण ५०७ बसेसची नियते आहे़ परंतु लोकसंख्या नियमानुसार महामंडळाला जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून बसेसची संख्या वाढविण्याची गरज असताना, प्रशासनाने नवीन बसेस बांधणी करण्याचे काम बंद केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़ शासन आणि महामंडळातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे एसटी तोट्यात आहे़ जिल्ह्यातील लोकसंख्यनुसार आणि मंडळाच्या नियमानुसार जवळपास दीड हजार बसेस असणे अपेक्षित आहे़ मात्र सर्वच लोक बसने प्रवास करीत नसल्याने या नियमानुसार बस दिल्या जात नाहीत, असे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे़ संपूर्ण लोक बसने प्रवास करीत नसले तरी किमान ५० टक्के लोक बसनेच प्रवास करतात़ अनेक गावांमध्ये बसशिवाय पर्याय नाही़ शासनाच्या उदासीनतेमुळेच खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहनधारकांची चांदी होते़ जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने अनेक गावे २०० ते ३०० किलोमीटर अंतरावर आहेत़ जिल्ह्यामध्ये एवढ्या अंतरावरील गावे असूनदेखील महामंडळाकडून केवळ ५०७ बसेस चालविल्या जातात़ यामुळे दिवसेंदिवस अवैध वाहनांची संख्या वाढत आहे़ नांदेड विभागास प्रत्येक महिन्याला जवळपास १३ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते़ विभागात तीन हजार कर्मचारी आहेत़ आठशेहून जागा रिक्त आहेत़ कर्मचारी आणि बसेसची संख्या विभागात आवश्यकतेपेक्षा कमी आहे़ यामुळे आगारनिहाय आणि विभागाचे उत्पन्न कमी आहे़ खासगी बसेसप्रमाणे वातानुकूलित आणि आरामदायी बस महामंडळाने उपलब्ध करून द्याव्यात़ एसटीचे प्रवासी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील गावागावात बस जाणे आवश्यक आहे़ तरच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे महामंडळाचे ब्रीद खरे ठरेल़ यासाठी शासन व एसटी महामंडळ प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे़ महामंडळाच्या नियमानुसार बसचे आयुष्य हे आठ वर्षांचे असते़ या कालावधीत १० लाख किलोमीटरपर्यंत बस चालविली जावू शकते़ यानंतर ती भंगारामध्ये विकल्या जाते़ बसच्या आयुष्यात ती संपूर्ण देशाला ६५ ते ६७ वेळा फेर्‍या मारू शकते़ आयुष्य संपलेल्या बसेसची संख्या महामंडळात अधिक आहे़ खड्ड्यांमुळे आयुष्य घटले जिल्ह्यासह मराठवाड्यातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून याचा फटका एसटीला बसत आहे़ खराब रस्त्यामुळे एसटीचे आयुष्य कमी होवून अतिशय कमी कालावधीत भंगार होत आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणारे बहुतांश रस्ते वाहन चालविण्यायोग्य नाहीत़ भंगार बसेसमुळे टाळाटाळ महामंडळाच्या बहुतांश बसमध्ये स्वच्छता नसते़ त्यातही त्या बस भंगार असतात़ अनेक बसमधील कुशनही फाटके आहे़ तिकिटात वाढ करण्यात आली, मात्र सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे़ स्वच्छता कर्मचार्‍यांच्या अनेक जागा रिक्त आहेत़ अस्वच्छ आणि भंगार बसमुळे अनेक प्रवासी बसने प्रवास करण्यास टाळतात़ सध्या उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे रेल्वे आणि बस हाऊसफुल्ल होत आहेत़ मात्र, एसटी महामंडळाकडून नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, शेगाव आदी ठिकाणी मोजक्याच बस सोडण्यात येत आहेत़ प्रवाशांची वाढत्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्याची मागणी होत आहे़

Web Title: Population of 33 lakh buses is only 560

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.