नैसर्गिक ऑक्सिजनसाठी वृक्षलागवडच महत्त्वाची - मंगाराणी अंबुलगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:28+5:302021-06-06T04:14:28+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या वतीने नांदेड तालुक्यातील पासदगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात ...

नैसर्गिक ऑक्सिजनसाठी वृक्षलागवडच महत्त्वाची - मंगाराणी अंबुलगेकर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या वतीने नांदेड तालुक्यातील पासदगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या म्हणाल्या, कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा पडला, त्यावेळी आपणांस वृक्षलागवडीची जाणीव झाली. यातून आपण वृक्षसंवर्धनाचा धडा घेतला पाहिजे. कोरोना महामारीच्या काळात नांदेड जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे ऑक्सिजन प्लांट उभा करून रुग्णांसाठी सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु, भविष्यकाळात मुबलक प्रमाणात नैसर्गिक ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी वृक्षलागवडीची गरज आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षाची लागवड करून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यावेळी म्हणाल्या, पृथ्वीवरील वृक्ष, माती, हवा, पाणी यांसह नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करून पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पासदगाव येथील उपकेंद्राचा परिसर नैसर्गिकरीत्या चांगला असून, याठिकाणी बेलाची लावगड करून बेलवन तयार करावे. वड, पिंपळ, कदंब, उंबर, कडुलिंब, तुळस आदी झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात. तथागत गौतम बुद्धांना तर पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती. असे ऑक्सिजनयुक्त झाडे लावावीत. तसेच प्रत्येक व्यक्तीने घराच्या परिसरात, शेतात किंवा गावात किमान तीन झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी यू. डी. तोटावार यांनी केले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, व्ही. आर. पाटील, गटविकास अधिकारी यू. डी. तोटावार, सरपंच ललिताताई अन्नपूर्ण, उपसरपंच पंचफुला जाधव, सहायक गटविकास अधिकारी अनिता सरोदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी मिरकुटे, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, नरेश शास्त्री, डॉ. जयश्री जाधव, डॉ. वर्षा देव्हडे आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सभापती सुखदेव जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार गोविंद मांजरमकर यांनी मानले.