रेल्वेतील चो-यांनी प्रवासी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:38 IST2018-02-10T00:36:24+5:302018-02-10T00:38:08+5:30
गुरुवारी नांदेडकडे येणा-या मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाईल, दागिने, बॅग आदी साहित्य लांबविले़ चोरी गेलेल्या बॅगमध्ये किडनी प्रत्योरापण झालेल्या रूग्णाची औषधी असल्याने एका महिला प्रवाशाने आरडाओरड केली़ तक्रार दाखल करण्यास परभणी स्थानकातील पोलीस सहकार्य करीत नसल्याने गाडी थांबविण्यात आली़ जोपर्यंत तक्रार घेणार नाहीत तोपर्यंत गाडी हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली़

रेल्वेतील चो-यांनी प्रवासी हतबल
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गुरुवारी नांदेडकडे येणा-या मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाईल, दागिने, बॅग आदी साहित्य लांबविले़ चोरी गेलेल्या बॅगमध्ये किडनी प्रत्योरापण झालेल्या रूग्णाची औषधी असल्याने एका महिला प्रवाशाने आरडाओरड केली़ तक्रार दाखल करण्यास परभणी स्थानकातील पोलीस सहकार्य करीत नसल्याने गाडी थांबविण्यात आली़ जोपर्यंत तक्रार घेणार नाहीत तोपर्यंत गाडी हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली़
रेल्वेस्थानक परिसरात बहुतांश ठिकाणी कॅमेरे बसविल्याने चोरट्यांनी काही दिवसांपासून आपला मोर्चा गाड्यांमध्ये वळविला आहे़ नंदीग्राम, तपोवन, सचखंडसह मराठवाडा एक्स्प्रेस अधूूनमधून चोरी झाल्याची नोंद ठाण्यात होते, परंतु मराठवाडा एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक डी-१० मध्ये गुरुवारी जवळपास आठ ते दहा जणांचे मोबाईल, पॉकेट, बॅग चोरट्यांनी लांबविले.
सदर गाडीत प्रवास करणा-या एका वृद्ध महिलेची रेल्वेत वरील बाजूस ठेवलेली कापडी पिशवी चोरीस गेली़ यामध्ये रोख रकमेसह औषधी होती़ सेवानिवृत्त कर्मचारी डॉ़ए़बी़बेळकोणीकर आणि त्यांच्या पत्नी औरंगाबाद येथून नांदेडला येण्यासाठी बसले होते़
बॅगमध्ये डॉ़ बेळकोणीकर यांची दर दोन तासाला घ्यावयाची औषधी असल्याने त्यांच्या पत्नीने घाबरून गोंधळ घातला़ परंतु, कोणीही बॅग परत केली नाही़
दरम्यान, परभणी स्थानक आल्यानंतर डी-१० सह आजूबाजूचे डबे तपासण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली़ परंतु, त्यांनी नकार देत नांदेड ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला़ गाडी सुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबविली़
पोलीस चढ्या आवाजात वृद्ध महिलेला बोलत आहेत़ हे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यासह महिलेने जोपर्यंत तक्रार नोंदवून घेत नाहीत तोपर्यंत रेल्वे पुढे जाणार नाही, असा पवित्रा घेतला़ यावेळी एका पोलीस कर्मचा-याने पुढे येत रेल्वेत बसून परभणी ते पूर्णा प्रवासादरम्यान पिशवी चोरी, मोबाईल चोरी झाल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या़
डॉ़बेळकोणीकर यांनी ३० हजार रूपये रोख रक्कम, पाच हजार रूपयांचे कपडले असलेली बॅग चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांना दिली़ तर अन्य प्रवाशांनी मोबाईल चोरीस गेल्याचे लेखी दिले़
टोल फ्री क्रमांकावरील तक्रारीस प्रतिसाद
डॉ़बेळकोणीकर यांची बॅग चोरीस गेल्याची तक्रार परभणी स्थानकावर घेतली जात नसल्याने त्यांचे बंधू सुरेंद्र बेळकोणीकर यांनी रेल्वेच्या टोल फ्री १८००१११३२२ या क्रमांकावर फोनद्वारे तक्रार दिली़ त्यानंतर पूर्णा स्थानकावर गाडी आल्यानंतर पूर्णा ठाण्यातील कर्मचारी सदर डब्यात आले होते़ बेळकोणीकर यांनी पोलिसांच्या असहकार्याबद्दल स्टेट पोलीस कंट्रोल रूम, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा आयुक्त, सिकंदराबाद यांच्याकडेदेखील तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले़
रेल्वे पोलिसांकडून चोरट्यांना पाठबळ
रेल्वेत चोरी झालेल्या घटनांविषयी तक्रारी देण्यास पुढे आलेल्या प्रवाशांना चढ्या आवाजात बोलून ठाण्याबाहेर काढले जाते़ त्यामुळे बहुतांश चोºयांची कागदोपत्री नोंदच येत नाही़ प्रवासादरम्यान नेमके कुठे चोरी झाली ही बाब प्रवाशांना माहिती नसते़ गाडीतून उतरल्यानंतर अथवा प्रवासात लक्षात येते़ परंतु, जिथे चोरी झाली तिथे तक्रार देण्याचा अजब सल्ला पोलिसांकडून दिला जातो़ तक्रार देण्यास गेलेल्या प्रवाशांनाच पोलीस असे प्रश्न विचारतात की त्यानेच चोरी केली की काय? असा प्रश्न पडतो़