नांदेड : बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा घोटाळा राज्यभर गाजल्यानंतर सोमवारी रात्री नांदेडातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात २०२४ पासून तब्बल ४ हजार ४५३ शेतकऱ्यांच्या नावावर ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस विमा भरला होता. विशेष म्हणजे त्यात नऊ सुविधा केंद्र चालक हे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत. तर काही महाभागांनी चक्क उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने जिल्ह्यात पीक विमा भरला. आता या ४० सेतू सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यात अशी अनेक प्रकरणे असण्याची दाट शक्यता आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना ही शासन आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत चालविली जाते. २०२४ पासून काही सामाईक सुविधा केंद्र चालकांनी शासनाच्या मालकीच्या, संस्थांच्या नावावर असलेल्या, करार, संमतीपत्र नसलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरला होता. छाननीत ही संख्या ४ हजार ४५३ एवढी निघाली. त्यात ४० सेतू सुविधा केंद्र चालकांची नावे पुढे आली. त्यामध्ये परळी, परभणी, पुणे, लातूर, जालना, नांदेड तसेच उत्तर प्रदेशातील सेतू सुविधा केंद्र चालकांचा समावेश होता. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातच सर्वात अगोदर बोगस पीक विम्याला वाचा फुटली होती. त्याच बीड जिल्ह्यातील नऊ सुविधा केंद्र चालकांचाही नांदेडातील घोटाळ्यात सहभाग आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेशजिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ४० सेतू सुविधा केंद्र चालकांच्या विरोधात कारवाईच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिल्या होत्या. त्यात दहापेक्षा जास्त बोगस अर्ज दाखल केलेल्या सेतू सुविधा केंद्र चालकांकडून खुलासे मागविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हास्तरीय आढावा बैठकीत हे खुलासे एकमताने नामंजूर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला.