कासराळी : काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य वेगवेगळ्या विचार आणि संघटनांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पाचपिंपळी या सात सदस्यीय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत केवळ सातच सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने पाचपिंपळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता केवळ याबाबतच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील-पाचापिंपळीकर, तालुका सरचिटणीस धोंडिबा पाटील-कपाळे, भाजपचे विजय पाटील, बळवंत लुट्टे यांची शिष्टाई येथे यशस्वी ठरली असून, काँग्रेस, भाजप व अन्य विचारांच्या कार्यकर्त्यांच्या या गावात बिनविरोधचा प्रस्ताव समोर आला. अनेकांनी या प्रस्तावाला पक्षीय, वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सात सदस्यांच्या पाचपिंपळी ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. या जागांकरिता कमलकिशोर पाटील, इंदरबाई रामपुरे, शोभा कमळेकर, चंद्रकलाबाई पाटील, रेखाबाई वाघमारे, महादाबाई जाधव, रामदास श्रीरामे अशा सातच नावांची नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज आल्याने पाचापिंपळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध* झाल्याच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. वास्तविक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ग्रामस्तरावर असतात. प्रत्येकांची विचारधारा भिन्न असते. त्यावर एकमत होईलच, असे नसते. मात्र, दोन हजार लोकसंख्येच्या पाचपिंपळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय मतभेद बाजूला सारुन बिनविरोध केलेली निवडणूक इतरांसाठी आदर्शवत आहे. ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, सरचिटणीस धोंडिबा पाटील-कपाळे, आनंदराव माली-पाटील, प्रताप रामपुरे, विजय पाटील, चेअरमन प्रल्हाद पाटील, गणेश रामपुरे, गणेश मुकदम, माधव पाटील, पांडुरंग रामपुरे, संतोष रामपुरे, चंद्रकांत वाघमारे, माधव श्रीरामे, व्यंकट पिंपळे आदींची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध करण्याच्या आवाहनाला सर्व ग्रामस्थांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यासाठी ग्रामस्थांचे आभार मानले पाहिजेत. - धोंडिबा पाटील-कपाळे (ग्रामस्थ आणि सरचिटणीस काँग्रेस कमिटी, बिलोली)