धक्कादायक! प्रेम केले, म्हणून भावी डॉक्टर मुलीचा कुटुंबीयांनीच खून करून प्रेत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 06:40 AM2023-01-28T06:40:20+5:302023-01-28T06:41:50+5:30
नांदेडपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावरील महिपाल पिंपरी या गावात ‘ऑनर किलिंग’चा थरार प्रजासत्ताक दिनी उघडकीस आला.
नांदेड :
नांदेडपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावरील महिपाल पिंपरी या गावात ‘ऑनर किलिंग’चा थरार प्रजासत्ताक दिनी उघडकीस आला. उच्चशिक्षित मुलीचे गावातील मुलासोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने कुटुंबातील सदस्यांनीच आधी तिचा गळा आवळून खून केला, नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात जाळून राख २२ किमी अंतरावर जाऊन गोदावरी नदीत शिरविली. मात्र, एका निनावी फोनने या खुनाचे बिंग फोडले. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा बनाव निर्माण करणारे वडील, भाऊ, मामासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिसकोठडी मिळाली.
शुभांगी जनार्धन जोगदंड (२३) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती नांदेडमधील आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तृतीय वर्षाला होती. दोन वर्षांपासून तिचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याला कुटुंबीयांचा विरोध होता. तिची समजूतही काढण्यात आली. काही दिवस भेटणे बंद झाले.
कुटुंबीयांनी तिचे लग्न जुळविले. वराकडील मंडळींना प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर लग्न मोडले. त्यामुळे गावात बदनामी झाल्याची भावना होऊन कुटुंबीयांनी शुभांगीचा काटा काढण्याचा कट रचला. रविवार, २२ जानेवारी रोजी रात्री पाच जणांनी शुभांगीचा रुमालाने गळा आवळून खून केला. तिचे प्रेत खताच्या पोत्यात टाकून शेतात नेले. तेथे ज्वारीच्या पिकात सरण रचून मृतदेह जाळला. पहाटेच्या सुमारास राख आणि अस्थी २२ किमी अंतरावरील गोदावरी नदीत विसर्जित केल्या.
पश्चात्तापाची लकेरही नाही
शुभांगीच्या खुनानंतर आरोपी गावात वावरत हाेते. शेतीची नियमित कामे करीत होते. चेहऱ्यावर पश्चातापाची लकेरही नव्हती.
हात थरथरू नयेत, म्हणून दारू प्यायले
लोकमत चमूने गावात भेट दिली असता संपूर्ण गाव दहशतीत असल्याचे दिसून आले. लेकीचा खून करताना हात थरथरू नयेत म्हणून आरोपींनी मद्यप्राशन केल्याचे सांगितले जाते. जेथे शुभांगीला जाळण्यात आले तेथे पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात पाणी सोडले गेले. त्यावर नांगरही फिरविला गेला.
दु:ख अन् संतापही : या घटनेबाबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दु:ख व संतापही व्यक्त केला.
...अशी उघड झाली घटना
सोमवारी शेजाऱ्यांना शुभांगी दिसली नसल्याने कुजबुज सुरू झाली. गुरुवारी एका खबऱ्याने लिंबगाव पोलिसांना शुभांगीचा खून करून प्रेत जाळल्याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची उकल झाल्यानंतर शुभांगीचे वडील जनार्धन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी शेषराव जोगदंड, गोविंद केशवराव जोगदंड आणि मामा केशव शिवाजी कदम यांना अटक केली.