असेल वशिला तरच जा लसीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:44+5:302021-05-18T04:18:44+5:30
दरवेळी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किती दिवसांचे अंतर असावे, यावरून गोंधळ घालण्यात येत आहे. पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील ...

असेल वशिला तरच जा लसीला
दरवेळी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किती दिवसांचे अंतर असावे, यावरून गोंधळ घालण्यात येत आहे. पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाच आता डोस देण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे २४ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी नांदेड शहरात पहाटे चार वाजेपासूनच नागरिक लसीकरणाच्या रांगेत उभे राहत आहेत. जुना कौठा, जिल्हा रुग्णालय, श्यामनगर या ठिकाणी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी कौठा भागात तर धक्काबुक्की आणि शिवीगाळचा प्रकार घडला होता. त्यानंतर, सोमवारी पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या ५० नागरिकांनाच टोकण वाटप करण्यात आले. इतर नागरिकांनी विचारणा केली असता, टोकण संपल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी केंद्राचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणखी २५ जणांना लस देण्यात आली, तर उर्वरित नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला देण्यात आला. प्रत्येक केंद्रावर अशा प्रकारे शंभरऐवजी कमी टोकणचे वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर, वशिला असलेल्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. प्रशासनाने लसीकरणासाठी केलेल्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
वशिला असेल, तर बिनबोभाट मिळते लस
एकीकडे नोंदणी करूनही लस मिळत नाही, तर दुसरीकडे दांडगा वशिला अथवा ओळख दाखविल्यानंतर बिनबोभाट लस दिली जात असल्याचा मागील काही दिवसांतला नागरिकांचा अनुभव असल्याने या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या एकूणच प्रकारामुळे शहरात ज्यांच्यावर लसीकरनाची जबाबदारी सोपविली आहे. ते अधिकारही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.