अत्यावश्यक सेवेतील नागरिकच रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST2021-04-16T04:17:15+5:302021-04-16T04:17:15+5:30
नांदेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशावरुन बुधवारी रात्रीपासूनच जिल्हाभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुरुवारी ...

अत्यावश्यक सेवेतील नागरिकच रस्त्यावर
नांदेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशावरुन बुधवारी रात्रीपासूनच जिल्हाभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुरुवारी रस्त्यावरील गर्दी ओसरली असली, तरी तुरळक वर्दळ ठिकठिकाणी होती. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात होती. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत १,१५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे रुग्णवाढीचे प्रमाणही चिंताजनक आहे. दररोज सुमारे दीड हजार नवे बाधित आढळत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला असून, बाधित रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत असून, रेमडेसिविर इंजेक्शनसह इतर औषधांसाठीही त्यांना धावपळ करावी लागत आहे. त्यातच ऑक्सिजनचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आता घरातच थांबण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येणाऱ्या काळात संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम सर्वांनीच पाळण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरील गर्दी ओसरली असली, तरी ज्यांना नियमातून सूट दिली आहे, अशा अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची वर्दळ ठिकठिकाणी होती. दुसरीकडे अत्यावश्यक सेवा म्हणून दिलेल्या सुटीचा गैरफायदा घेत अनेकजण खरेदीसाठीही बाहेर पडल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रार्दुभाव खऱ्या अर्थाने थांबविण्यासाठी रस्त्यावर फिरणाऱ्यांना रोखण्याची गरज आहे.
चौकट----------------
पळवाटा शोधू नका... बेडही मिळेनात
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे या रुग्णांच्या नातेवाईकांची औषधे तसेच इतर गरजेच्या बाबींसाठी रस्त्यावर वर्दळ दिसून येते. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील अनेक विभागांना मुभा दिलेली आहे. मात्र, त्यानंतरही नियमात पळवाटा शोधून अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. पळवाट काढून फिरता येत असले तरी बाधित झाल्यानंतर ‘ना बेड लवकर उपलब्ध होतो... ना इंजेक्शन’. त्यामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊनचे नियम सर्वांनीच काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे.