नांदेडमध्ये सव्वालाख बनावट औषधी गोळ्या जप्त पण कंपनीवर अद्याप गुन्हा नाही

By शिवराज बिचेवार | Updated: December 13, 2024 11:33 IST2024-12-13T11:31:15+5:302024-12-13T11:33:13+5:30

नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात ‘न्यूक्लॉस ६२५’ या गोळ्यांबाबत सदोष अहवाल आल्यानंतर त्याचा वापर थांबवून ‘एफडीए’ला ऑक्टोबर महिन्यात कळविण्यात आले होते.

one lakh 23 thousand fake medicine pills seized in Nanded; No crime against the company even after a month and a half | नांदेडमध्ये सव्वालाख बनावट औषधी गोळ्या जप्त पण कंपनीवर अद्याप गुन्हा नाही

नांदेडमध्ये सव्वालाख बनावट औषधी गोळ्या जप्त पण कंपनीवर अद्याप गुन्हा नाही

नांदेड : राज्यभरात सध्या बनावट औषधांचे प्रकरण गाजत आहे. नांदेडमध्येही श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातून मे २०२३ मध्ये ‘न्यूक्लॉस ६२५’ या गोळीचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात आला होता. त्यानंतर १ लाख २३ हजार गोळ्यांचा साठा अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ने दोन दिवसांपूर्वी जप्त केला. परंतु, अहवाल येऊन दीड महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटला असताना संबंधित कंपनीविरोधात मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ती कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती पुढे येत आहे.

कोणत्याही कंपनीकडून औषधांचा साठा आल्यानंतर संबंधित कंपनी त्याबाबत प्रमाणपत्र देते. त्यानंतर प्रशासन या औषधांचा नमुना मनीषा अनालायटिकल लॅबॉरेटरीजकडे तपासणीसाठी पाठवते. त्याचा अहवाल येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तोपर्यंत आवश्यक असेल तरच या औषधांचा वापर करण्यात येतो. अहवालात ही औषधे बनावट आढळल्यास त्याचा वापर थांबवून ‘एफडीए’कडे त्याचा साठा देण्यात येतो. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात ‘न्यूक्लॉस ६२५’ या गोळ्यांबाबत सदोष अहवाल आल्यानंतर त्याचा वापर थांबवून ‘एफडीए’ला ऑक्टोबर महिन्यात कळविण्यात आले होते. परंतु, ‘एफडीए’ने दोन दिवसांपूर्वी या गोळ्यांचा साठा जप्त केला. तसेच आतापर्यंत संबंधित पुरवठादार कंपनीवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

ऑगस्ट २०२४ मध्येही जिल्हा रुग्णालयातील ‘बिफोसिव्ही ६२५’ ही गोळी अप्रमाणित आढळली होती. त्यानंतर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी ‘एफडीए’ने मुंबईपर्यंत वितरकांची चौकशी केली. अगदी केरळ येथील ‘ड्रग कंट्रोलर’ यांच्याशीही संवाद साधला. मात्र त्यातून माहिती काढण्यात ‘एफडीए’ला अपयश आले. आता पुन्हा दुसऱ्यांदा रुग्णालयातील बनावट औषधाचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी ‘न्यूलॉक्स ६२५’ या गोळ्यांचा तब्बल १ लाख २३ हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पाच कंपन्याची औषधाची मागितली माहिती
शासनाकडून उत्तराखंडच्या ब्रिस्टल फार्मा, रिफंट फार्मा (केरळ), बायाटेक फार्म्युलेशन (उत्तराखंड), मेलबर्न बायो सायन्स (केरळ) आणि एसएमएन लॅब (उत्तराखंड) या पाच कंपन्या बनावट असून, या कंपन्यांनी अनेक ठिकाणी बनावट औषधांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे या कंपन्यांची औषधे असल्यास त्याबाबत त्वरित कळवावे, असे पत्र संचालक कार्यालयाने जिल्हा रुग्णालयांना पाठवले आहे.

कंपन्या स्वत:हून देतात प्रमाणपत्र, तरीही तपासणी
कंपन्यांकडून औषध पुरवठा केल्यानंतर त्या स्वत:हून औषधे वापरण्यासाठी प्रमाणपत्र देतात. परंतु, त्यानंतरही आपण औषधांचे नमुने तपासणीसाठी एमएएलकडे पाठवतो. तोपर्यंत त्याचा वापर करत नाही. दोन ते तीन महिन्यांत अहवाल आल्यानंतरच त्याचा वापर करण्यात येतो. ‘न्यूक्लॉस ६२५’ या गोळीमध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रग नव्हते. त्यामुळे त्याचा रुग्णावर कोणताही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

Web Title: one lakh 23 thousand fake medicine pills seized in Nanded; No crime against the company even after a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.