व्यापार्यांचे असहकार आंदोलन मनपाचे कंबरडे मोडणार
By Admin | Updated: May 14, 2014 01:15 IST2014-05-14T00:07:47+5:302014-05-14T01:15:58+5:30
स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून व्यापार्यांनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनामुळे मनपाचे मात्र आर्थिक कंबरडे मोडणार आहे़

व्यापार्यांचे असहकार आंदोलन मनपाचे कंबरडे मोडणार
नांदेड: स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून व्यापार्यांनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनामुळे मनपाचे मात्र आर्थिक कंबरडे मोडणार आहे़ मनपाकडे नाममात्र दहा रुपये एलबीटी भरुन सुरु केलेल्या आर्थिक असहकार आंदोलनाला आ़ ओमप्रकाश पोकर्णा, महापौर अब्दुल सत्तार यांनीही पाठिंबा दर्शविला आहे़ नांदेडच्या व्यापार्यांनी सुरुवातीपासूनच एलबीटीला विरोध केला आहे़ परंतु मध्यंतरी राजकीय मध्यस्थीमुळे व्यापार्यांनी काही काळासाठी आंदोलन मागे घेतले होते़ त्यात मनपाने पुन्हा एलबीटीच्या दरात वाढ केल्याने व्यापार्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. त्याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच व्यापार्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ मात्र यावेळी व्यापार्यांनी थेट दुखत्या नसेवरच हात ठेवला आहे़ अगोदरच कर्जाचे हप्ते आणि व्याज फेडण्याच्या प्रयत्नात सर्व मालमत्ता गहाण ठेवणार्या महापालिकेला या आंदोलनामुळे मोठा झटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ यंदा मनपाला एलबीटीतून ४५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते़ त्यामुळे कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला़ आता व्यापार्यांनी एलबीटीचे नाममात्र दहा रुपये भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे मनपाच्या तिजोरीत एलबीटीच्या रुपाने जमा होणारी रक्कम काही हजारांच्या आतच असेल़ त्यामुळे मनपाचे आर्थिक गणित बिघडणार हे मात्र नक्की़ त्यात १४ मे रोजी पुणे येथे व्यापार्यांची बैठक होणार असून त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे़ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यापार्यांनी पुकारलेले आंदोलन मनपा प्रशासनाची गोची करणारे ठरणार आहे़ (प्रतिनिधी) विधानसभेत एकत्रित विरोध करु-आ़पोकर्णा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांनी येत्या विधानसभेच्या अधिवेशनात एलबीटी रद्द करण्याबाबत सर्व काँग्रेसचे आमदार एकमुखाने मागणी करणार असल्याचे सांगितले़ एलबीटी रद्दचा ठराव घेणार - सत्तार महापौर अब्दुल सत्तार हे सोमवारी झालेल्या व्यापार्यांच्या बैठकीला उपस्थित होते़ यात त्यांनी प्रशासनावरच सडकून टीका केली़ तसेच येत्या ३० मे रोजी मनपाच्या होणार्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत एलबीटी रद्द करण्याचा ठराव घेणार असल्याचेही सांगितले़ त्यामुळे महापौरांच्या या निर्णयावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे़