लसीकरण केंद्रावर ड्युटी नको रे बाबा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:45+5:302021-05-01T04:16:45+5:30
नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग धरला होता. परंतु, आता लसींचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत ...

लसीकरण केंद्रावर ड्युटी नको रे बाबा...
नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग धरला होता. परंतु, आता लसींचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक केंद्र बंद करण्यात आली आहेत. तर ज्या केंद्रावर लस उपलब्ध आहे, त्याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. लस संपल्यानंतर नागरिक याठिकाणी असलेले डॉक्टर आणि परिचारिकांशी हुज्जत घालत आहेत. त्यातून वादाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ‘लसीकरण केंद्रावर ड्युटी नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १५ हजारांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. ग्रामीण भागात २ लाख ५५ हजार ४३ जणांनी तर शहरी भागात ६० हजार २१४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १ मेपासून लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, लसच उपलब्ध नसल्याने सर्वांची गोची झाली आहे. जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे याठिकाणी लस न मिळाल्याने नागरिक याठिकाणी असलेले डॉक्टर आणि परिचारिकांशी वाद घालत आहेत. शासनाने अगोदर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली. परंतु, लसच उपलब्ध नसल्यामुळे अद्याप त्याबाबत संदिग्धता आहे. परंतु, शनिवार, १ मेपासून लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. लस न मिळाल्याने याठिकाणी वादाच्या घटनाही घडू शकतात. त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी डॉक्टर आणि परिचारकांनी केली आहे.