नवीन जम्बो कोविड केअर सेंटर झाले कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:40+5:302021-04-20T04:18:40+5:30

नांदेड : जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची ...

The new Jumbo Covid Care Center became operational | नवीन जम्बो कोविड केअर सेंटर झाले कार्यान्वित

नवीन जम्बो कोविड केअर सेंटर झाले कार्यान्वित

नांदेड : जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करीत आहोत. सोळा तालुक्यांसह आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात असला तरी तालुका पातळीवरील आणि ग्रामीण भागात बाधितांना आरोग्याच्या सुविधा सुलभ मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्यास सांगितले असून, आजच्या घडीला ऑक्सिजनच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड महानगरातील आणि जिल्ह्यातील कोरोना बाधिताची वाढती संख्या लक्षात घेऊन भक्ती लॉन्स येथे सोमवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन केले व पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, महानगरपालिकेच्या महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटरसह मालेगाव, अर्धापूर यांसारख्या गावातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड बाधितांसाठी उपचार केंद्र सुरु करीत असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात असून, याचा तुटवडा आहे हे नाकारता येत नाही. शासनातर्फे वितरक आणि उत्पादक यांच्याशी समन्वय साधला जात आहे. जिथे आवश्यकता वाटते आहे त्याठिकाणी कायदेशीर कार्यवाही करून मार्ग काढीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर जी काही माहिती असेल ती मिळणे आवश्यक असून, यासंदर्भात प्रत्येक कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे माहिती केंद्र सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या. या नवीन कोविड केंद्रातील ऑक्सिजन यंत्रणा आणि इतर साहित्य चांगल्या स्थितीत सुरु आहे की नाही, यांची खातरजमा त्यांनी स्वत: करून घेतली. या दोनशे खाटांच्या कोविड सेंटरमध्ये सर्व बेड ऑक्सिजन यंत्रणेसह असून, आवश्यक तो सर्व स्टाफ ही महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून दिला आहे. सद्यस्थितीत ११२ जणांचा स्टाफ असून, तो चार शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहे. तसेच चोवीस डॉक्टरांचे पथक या जम्बो सेंटरमधील रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन करेल. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा, यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: The new Jumbo Covid Care Center became operational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.