- शेखर पाटीलमुखेड (नांदेड): राष्ट्रीय महामार्ग १६१-अ वरील मुखेड शहरातील बाराहाळी चौकात बुधवारी (दि. १७) दुपारी ३ च्या सुमारास एका मालवाहतूक ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या भीषण अपघातात तब्बल २४ नागरिक जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात अचानक आणि अनपेक्षितपणे झाल्याने मुखेड शहर हादरले आहे.
मुखेड शहरातील बाराहाळी चौकात दुपारी प्रचंड वर्दळ होती. त्याचवेळी देगलूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचा (क्रमांक एमएच ०६ ऐक्यू ६२४९) ताबा सुटला. अनियंत्रित झालेल्या या ट्रकने चौकात उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या टॅक्सीला, पाणीपुरी गाड्याला, पानपट्टी व फळांच्या गाड्यांना, एका दुचाकीला आणि एका ऑटो रिक्षाला धडक दिली. अनेक वाहनांचा चक्काचूर करत ट्रक पुढे दुभाजकावर आदळून थांबला.
तिघांची प्रकृती गंभीरअपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एकूण २४ नागरिक जखमी झाले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार टांकसाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी अशोकराव गायकवाड (वय ५०, रा. हिब्बट), प्रविण इंगोले (वय १२, रा. हासनाळ) आणि बालाजी माकीनवाड (रा. दावणगिरी, ता. देगलूर) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
शहरात वाढते अपघातया अपघातामुळे मुखेड शहरातील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील नागरिकांच्या मते, अनेक जुने आणि कालबाह्य झालेले मालवाहतूक ट्रक बिनदिक्कतपणे रस्त्यांवरून धावत आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्यामुळे वर्दळ जास्त असते, मात्र महत्त्वाच्या चौकांमध्ये रबरी गतीरोधक, दिशादर्शक फलक आणि सिग्नल नाहीत. तसेच, रस्त्यांवरील अतिक्रमणेही अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष दिल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.