- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अर्धापूर तालुक्यातील देगाव कु. येथील एका मेंढपाळाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आरक्षणाच्या मागणीसह कर्जबाजारीपणा हे जीवन संपवण्याचे कारण नमूद केले आहे.
रामराव दिपाजी डोके (वय ४५ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. ते मेंढपाळ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी देगाव कु. परिसरातील एका विहिरीत रामराव डोके यांनी उडी घेऊन आपले जीवन संपवल्याचे उघड झाले. त्यांच्या खिशामध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे आणि कर्जबाजारीपणा या दोन कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्यासह पप्पू चव्हाण, कीर्तीकुमार रणवीर, गोविंद मुधळ, अरविंद मुधळ, भागवत वळसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रामराव डोके यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून, धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दोन दिवसांत तिसरी घटनारामराव डोके यांच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत तालुक्यात ही आत्महत्येची तिसरी घटना आहे. यावरून ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी समाज किती मोठ्या संकटात आहे, हे स्पष्ट होते.
Web Summary : Ramrao Doke, a shepherd, committed suicide demanding ST reservation for the Dhangar community and citing debt. He left a suicide note. This is the third such incident in two days in Ardhapur.
Web Summary : रामराव डोके, एक चरवाहे, ने धनगर समुदाय के लिए एसटी आरक्षण की मांग करते हुए और कर्ज का हवाला देते हुए आत्महत्या कर ली। उन्होंने एक सुसाइड नोट छोड़ा। अर्धापुर में दो दिनों में यह तीसरी घटना है।