नांदेडची पोलीस यंत्रणा मुख्य आरोपींच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:25 IST2018-08-11T00:23:19+5:302018-08-11T00:25:08+5:30
मेगा अॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत. मागच्या १५ दिवसांत मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे व्यस्त पोलीस विभागाने आता तपास वाढवल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली़

नांदेडची पोलीस यंत्रणा मुख्य आरोपींच्या शोधात
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : मेगा अॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत. मागच्या १५ दिवसांत मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे व्यस्त पोलीस विभागाने आता तपास वाढवल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली़
गेल्या महिन्यातील १८ तारखेला एफसीआय गोदामातून निघालेले शासकीय धान्य शासकीय संबंधित गोदामाकडे न जाता मेगा अॅग्रो कंपनीत वळले़ बऱ्याच दिवसांपासून पाळतीवर असलेल्या पोलिसांनी दहा तांदूळ व गव्हाचे ट्रक पकडले़ घटना होताच शासकीय वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार व त्यांचा पार्टनर दमकोंडवार आणि मेगा अॅग्रोचे मालक अजय बाहेती फरार झाले़ दहा ट्रकचालकांना नायगावच्या कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला़ सध्या सर्व ट्रक पोलिसांच्या ताब्यात आहेत़
---
- बिलोली, कुंडलवाडी, तसेच देगलूर व मुक्रमाबाद या शासकीय गोदामात एन्ट्री करून रास्त भाव दुकानदाराकडे द्वारपोच धान्य पोहोचवणे अपेक्षित होते़ मात्र पुरवठा विभागाला हाताशी धरून शासकीय वाहतूक कंत्राटदाराने परस्पर धान्याची विल्हेवाट लावल्याची माहिती पोलिसांनी से-रिपोर्टमध्ये बिलोलीच्या सत्र न्यायालयात दाखल केली़
- मॅनेजरने अॅग्रो कंपनीचा आपला संबंध नाही, आपण येथे कर्मचारीच नाही असा पवित्रा न्यायालयात घेतला, पण तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तापडिया मॅनेजर असल्याचे भक्कम पुरावे सादर केल्याने न्या़ एस़बी़ कचरे यांनी त्याचा जामीन फेटाळला़
- धान्य घोटाळ्यातील तपास व चौकशी वाढवण्यात आली असून शासकीय ठेकेदार पारसेवार व मेगा कंपनीचे संचालक अजय बाहेती यांना ताब्यात घेतल्यानंतरच संपूर्ण प्रकरण पुढे येणार आहे़ यात पुरवठा विभागातील काहीजण अडकण्याचीही शक्यता आहे.