नांदेड : खुदबई नगर परिसरात हातगाडा उभारण्याच्या वादातून एकाचा चाकूने निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१९ जुलै) सकाळी ८.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मृत व्यक्तीची ओळख शेख अजीम (वय ५५-६०) अशी असून, ते हातगाड्यावर व्यवसाय करून मजुरी करत होते. खुदबई नगर चौकात अमीर मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा पानठेला आहे. शेख अजीम यांनी त्या ठेल्याजवळ आपली हातगाडी उभी करण्याचा प्रयत्न केला असता, यावरून वाद निर्माण झाला होता.
अमीर मोहम्मद यांनी अजीम यांना पूर्वीच धमकी दिली होती की, “माझ्या ठेल्याजवळ हातगाडी लावलीस तर तुला खतम करेन.” हे अजीम यांचा मुलगा शेख आमेर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. हा वाद शुक्रवारी सकाळी पुन्हा उफाळून आला आणि मारामारीत अमीर आणि त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने अजीम यांच्यावर पोटावर चार-पाच वार करून त्यांचा जागीच खून केला.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी शेख आमेर यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार आरोपी व इतर काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन गढवे व पथकाने तातडीने कारवाई करून दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.