नांदेड महापालिकेला १५ वर्षांपासून कायम वैद्यकीय अधिकारी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 08:06 PM2020-03-12T20:06:56+5:302020-03-12T20:08:44+5:30

प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातीच शहरवासियांचे आरोग्य

Nanded Municipality has not got permanent medical officer for 15 years | नांदेड महापालिकेला १५ वर्षांपासून कायम वैद्यकीय अधिकारी मिळेना

नांदेड महापालिकेला १५ वर्षांपासून कायम वैद्यकीय अधिकारी मिळेना

Next
ठळक मुद्देबीएएमएसच्या हाताखाली एमबीबीएसशहरात महापालिकेचे १४ रुग्णालये आहेत. हे रुग्णालयही कंत्राटी डॉक्टरवरच चालवले जात आहेत.

- अनुराग पोवळे
नांदेड : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रातही प्रवेश केला असून राज्यात पुणे व मुंबईत रुग्ण आढळले आहेत. नांदेडमध्येही दोन संशयितांचे नमुने तपासण्यात आले. सुदैवाने ते निगेटीव्ह आले. असे असले तरीही नांदेडवासियांचे आरोग्य महापालिकेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हाती असून मनपाला गेल्या पंधरा वर्षांपासून कायम अधिकारी अद्याप मिळाला नाही. 

नांदेड महापालिकेची स्थापना मार्च १९९७ मध्ये झाली. मनपा स्थापनेच्या प्रारंभी डॉ. सादुलवार यांची नियुक्ती राज्य शासनाने केली होती. १९९७ ते २००० या कालावधीत सादुलवार यांनी येथे कार्यभार सांभाळला. त्यानंतर डॉ. प्रमोद व्यवहारे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मनपाला दोन वर्षे लाभले. त्यानंतर काही दिवसासाठी डॉ. गुट्टे हेही महापालिकेत वैद्यकीय अधिकारी पदावर रुजू झाले होते. त्यानंतर मात्र महापालिकेचा पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याचा शोध अद्याप संपला नाही. डॉ. साहेबराव मोरे यांच्याकडे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून बराच काळ पदभार देण्यात आला होता. 
सेवानिवृत्तीच्या काळात १२ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत डॉ. मोरे यांनी प्रभारी काम पाहिले. ३१ मार्च २०१३ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १ एप्रिल २०१३ ते १० मे २०१५ या कालावधीत डॉ. मीरा कुलकर्णी यांनी शहरवासियांचे आरोग्य सांभाळले. सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. मो. आसिफ मो. इब्राहीम यांनी १४ मे २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीत वैद्यकीय अधिकारी पद सांभाळले. त्यानंतर हा पदभार डॉ. सुमती ठाकरे यांच्या हाती १ जुलै २०१६ रोजी सोपवण्यात आला. त्याही ३१ आॅगस्ट २०१८ रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर डॉ. सविता यशवंतराव चव्हाण यांना १ सप्टेंबर २०१८ ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मनपा वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांना दोन महिन्यांतच पदावर दूर करत डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्या हाती १३ नोव्हेंबर रोजी २०१८ रोजी मनपाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे.  

शहरात महापालिकेचे १४ रुग्णालये आहेत. हे रुग्णालयही कंत्राटी डॉक्टरवरच चालवले जात आहेत. त्यामुळे एकूणच महापालिकेचे आरोग्य सेवेबाबतचे दुर्लक्ष हे गेल्या अनेक वर्षांपासून असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा फायदा हा शहरातील खाजगी रुग्णालयांना होत आहेत. महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर हे शहरातच खाजगी रुग्णालयेही चालवत आहेत. परिणामी मनपाच्या आरोग्य सेवेत हे डॉक्टर किती लक्ष देत असतील? ही बाबही संशोधनाचीच आहे.  शहरातील काही भागातील रुग्णालयाची सेवा वगळता बहुतांश रुग्णालये ही नावालाच उघडली जात असल्याची तक्रार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.  पण त्याचवेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कायमस्वरूपी वैद्यकीय यंत्रणाच नसल्याने प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हाती शहरवासीयांचे आरोग्य आता किती सुरक्षित आहे? ही बाब गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. महापालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी द्यावा, याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडेही मागणी करण्यात आली आहे. 


बीएएमएसच्या हाताखाली एमबीबीएस
महापालिकेत सध्या प्रभारीराज सुरू आहे. आयुक्तापासून ते सहायक आयुक्तांपर्यंत मनपात प्रभारी कारभार सुरू आहे. वर्ग ४ कर्मचाऱ्याच्या हाती वर्ग-२चे प्रभारीही नांदेड महापालिकेत देण्यात आले आहे. अनेक मजूर हे कार्यालयाचा भार सांभाळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागही बीएएमएस पदवी असलेल्या डॉक्टरच्या हातात सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत.राजकीय प्रभावातून मनपाच्या अनेक विभागात पदभार दिला जात आहे. नागरिकांच्या जीवन-मरणाला सांभाळणाऱ्या आरोग्य विभागाला तरी या राजकीय प्रभावातून मुक्त करावे, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
 

Web Title: Nanded Municipality has not got permanent medical officer for 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.