नांदेड : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय तापमान चढू लागले आहे. भाजपच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता प्रभागात चर्चेचा अन् विराेधाचा मुद्दा बनला आहे. मतदारांचा कौल मिळवण्याआधीच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि समाजघटकांचा विश्वास गमावण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही केवळ एका नेत्याच्या हट्टापायी उमेदवारांची ‘हेराफेरी’ केल्याचा आरोप आता उघडपणे ऐकायला मिळत आहे.
प्रभागात राहणारा, कायम जनतेच्या संपर्कात असलेला, प्रभागातील प्रश्नांची जाण असलेला प्रभावी उमेदवार द्यावा. जातीय समीकरणांचा समतोल साधत मराठा समाजातून स्थानिक चेहरा किंवा किमान प्रभागात वास्तव्यास असलेला ओबीसी उमेदवार द्यावा, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची रास्त भूमिका होती. मात्र, या सर्व मागण्यांना केराची टोपली दाखवत केवळ किशोर स्वामी यांच्या हट्टापायी कार्यकर्त्यांचा कसलाही पाठिंबा नसलेले पॅनल तयार करण्यात आले, अशी खदखद आता उफाळून येत आहे. या पॅनलमध्ये डाॅ. मंजूषा प्रसाद राणवळकर (अ), किशोर स्वामी (ब), सदिच्छा सोनी (क) आणि बलवंतसिंघ गाडीवाले (ड) यांचा समावेश आहे. त्यातील केवळ डॉ. मंजूषा राणवळकर यांच्या उमेदवारीला विरोध झाला नाही. मात्र, इतर सर्व उमेदवारांना विरोध असतानाही केवळ पैसेवाले उमेदवार म्हणून त्यांना या ठिकाणी रिंगणात उतरविल्याचे बोलले जात आहे.
निष्ठावंतांना डावलून ‘उपऱ्यांना’ संधीया प्रभागात गेली अनेक वर्षे भाजपसाठी काम करणारे जिल्हा सरचिटणीस सुनील भालेराव यांना उमेदवारी नाकारण्यात आली. स्थानिकांचा स्पष्ट विरोध असतानाही सदिच्छा सोनी यांना स्वामींच्या आग्रहामुळे उमेदवारी देण्यात आली, यामुळे पक्षांतर्गत असंतोष चिघळला आहे. जर केवळ पैसेवाल्यांना आणि मटका चालवणाऱ्यांनाच उमेदवारी द्यायची होती, तर आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी का राबायचे? असा संतप्त सवाल एका इच्छुक महिला उमेदवाराने थेट महानगराध्यक्षांसमोर उपस्थित केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. सदिच्छा सोनी यांचे पती मटका व्यवसायाशी संबंधित असल्याची चर्चा असून, स्वतः सदिच्छा सोनी यांनी कधीही भाजपच्या कार्यकर्त्या नव्हत्या. निष्ठावंत भालेराव कुटुंबीयांची उमेदवारी कापली. त्यामुळे भालेराव यांनी त्यांच्या मातोश्री नंदाबाई भालेराव यांना शिंदेसेनेकडून रिंगणात उतरविले आहे.
‘स्वामी साहेब, आम्ही तुम्हाला का मत द्यायचं?’ : मतदारांचा थेट सवालकिशोर स्वामी यांच्या पत्नी शैलजा स्वामी महापौर असताना प्रभाग क्रमांक ४ मध्ये अत्याधुनिक वाचनालय, सर्वसुविधांनीयुक्त दवाखाना, मेट्रो सिटीच्या धर्तीवरील स्ट्रीट लाइट्स अशा सुविधा देण्यात आल्या. मात्र, त्याच किशोर स्वामी यांनी प्रभाग क्रमांक ९ साठी काय केले? असा सवाल आता मतदार थेट विचारत आहेत. आनंदनगर, बाबानगर, मगनपुरा, शाहूनगर या भागांत पावसाळ्यात गुडघ्याएवढे पाणी साचते. ड्रेनेजलाइन, पाइपलाइन आणि रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अतिवृष्टीत नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले असताना किशोर स्वामी किंवा बलवंतसिंघ गाडीवाले हे या भागात कधी फिरकलेही नाहीत, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. जे आमच्या सुख-दुःखात नाहीत, त्यांना आम्ही मतदान का करायचं? असा रोष मतदार व्यक्त करत आहेत.
उमेदवारीसाठी मारामार; पण काहींच्या घरात दोन-दोन तिकिटे!भाजप सत्ताधारी पक्ष असल्याने महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या तब्बल पाचशेच्या घरात होती. त्यामुळे नेतृत्वावर प्रचंड दबाव होता. मात्र, अशा परिस्थितीतही किशोर स्वामी यांनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले. त्यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक ४ मधून रिंगणात आहेत. दुसरीकडे, बलवंतसिंघ गाडीवाले यांचे चिरंजीव विरेंद्र गाडीवाले हे प्रभाग १० मधून भाजपचे उमेदवार आहेत. एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट नाकारले जात असताना, एका घरात दोन-दोन उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमधील ‘उपऱ्यांची गर्दी’ निष्ठावंतांच्या मुळावर उठल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. इच्छुकांची संख्या प्रचंड असताना एका घरात एक उमेदवारी हा अलिखित नियम डावलण्यात आल्याचा फटका आता दोन-दोन उमेदवारी मिळविणाऱ्या कुटुंबीयांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Web Summary : Nanded BJP faces internal strife over ticket distribution for municipal elections. Allegations arise of prioritizing wealthy candidates over loyalists due to one leader's insistence. This sparked resentment, with accusations of ignoring dedicated workers and favoring outsiders, potentially impacting election outcomes.
Web Summary : नांदेड भाजपा में नगरपालिका चुनावों के लिए टिकट वितरण पर आंतरिक कलह है। एक नेता के हठ के कारण निष्ठावानों पर धनी उम्मीदवारों को प्राथमिकता देने के आरोप लगे हैं। इससे आक्रोश फैल गया है, कार्यकर्ताओं को अनदेखा करने और बाहरी लोगों का पक्ष लेने के आरोप लग रहे हैं, जिससे चुनाव परिणामों पर असर पड़ सकता है।