नांदेडात विमानतळ सुरक्षेला धोका असणारे अतिक्रमण हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:44 IST2018-05-09T15:44:01+5:302018-05-09T15:44:01+5:30
विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने आजपासून हटवण्यास प्रारंभ केला आहे.

नांदेडात विमानतळ सुरक्षेला धोका असणारे अतिक्रमण हटवले
नांदेड : विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने आजपासून हटवण्यास प्रारंभ केला आहे. या अतिक्रमणामुळे विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.
नांदेड विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच म्हाळजा परिसरात भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केटची उभारणी केली होती. महापालिकेने प्रारंभी फळ मार्केटला तात्पुरत्या स्वरूपात परवाना दिला होता. प्रारंभी ४३ दुकानांना परवाना असताना या दुकानाची संख्या दोनशेहून अधिक झाली होती. फळ आणि भाजीपाला मार्केटमुळे येणारे पक्षी पाहता विमानांनाही धोका निर्माण झाला होता. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेला सुचित केले होते. त्यानंतर महापालिकेने एक समिती स्थापन करुन विमानतळाचे सर्व बाजूंनी निरीक्षण केले. तसेच अनधिकृत बांधकाम केलेल्या मालमत्ता धारकांना नोटीसा बजावल्या.
९ एप्रिल रोजी पाहणी केली होती. त्यानंतर महिनाभरापासून हे अतिक्रमण हटवण्याबाबत हालचाली सुरू होत्या. अखेर ९ मे रोजी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मिळताच हे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ करण्यात आला. दुपारपर्यंत जवळपास २०० शेड पाडण्यात आली होती. त्याचवेळी मनपाने प्रारंभी परवानगी दिलेल्या ४३ दुकाने हलवण्यासाठी तीन महिन्याची परवानगी दिली आहे. या मोहिमेत उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यासह संतोष कंदेवार, क्षत्रिय अधिकारी संजय जाधव, अविनाश अटकोरे, सुधीर इंगोले, मनपा पोलिस पथक, स्वच्छता निरीक्षक, बांधकाम निरीक्षक, विद्युत पथक उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांच्यासह दोन पोलिस निरीक्षक, दोन सहा. पोलिस निरीक्षक, ५० पोलिस कर्मचारी, मनपा पोलिस पथक बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. मोहिमेच्या प्रारंभी व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो विरोध हाणून पाडण्यात आला.
आयुक्तांची दुसऱ्याच दिवशी कारवाई
महापालिकेच्या आयुक्तपदी एल.एस. माळी हे मंगळवारी सायंकाळी रुजू झाले. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी नांदेड विमानतळ सुरक्षेला धोका निर्माण करणारे अतिक्रमण हटवून आपल्या नांदेड येथील कामाचा प्रारंभ केला आहे. या परिसरातील दोनशे दुकाने हटवण्यात आली आहे तर ४३ दुकांनाना तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे.