नांदेड मनपाकडून भूखंड जप्तीचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:37 IST2018-01-25T00:37:13+5:302018-01-25T00:37:20+5:30
मनपाच्या नोटीसनंतरही मालमत्ता कर थकविणा-या मालमत्ताधारकांच्या विरोधात मनपाने कठोर पावले उचलली आहेत़ चार दिवसांत महापालिकेने तब्बल ६९ मोकळे भूखंड जप्त केले आहेत़

नांदेड मनपाकडून भूखंड जप्तीचा धडाका
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मनपाच्या नोटीसनंतरही मालमत्ता कर थकविणा-या मालमत्ताधारकांच्या विरोधात मनपाने कठोर पावले उचलली आहेत़ चार दिवसांत महापालिकेने तब्बल ६९ मोकळे भूखंड जप्त केले आहेत़
महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बेताची आहे़ त्यात राज्य शासनाकडूनही निधीबाबत हात आखडता घेण्यात येत आहे़ त्यामुळे मनपाला उत्पन्नवाढीकडे लक्ष द्यावे लागणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक मालमत्ताधारकांनी कोट्यवधी रुपये कर थकविला आहे़ अशा थकित मालमत्ताधारकांच्या विरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरु केली आहे़ मागील तीन दिवसांत मनपाने अशाप्रकारे ३९ भूखंड जप्त केले आहेत़ त्यातील काही जणांनी त्वरित धनादेश देवून जप्तीची कारवाई टाळली़ त्यानंतर बुधवारी महापालिकेने ३० भूखंड जप्त केले आहेत़ त्यामध्ये क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ तरोडा सांगवीअंतर्गत मोकळ्या भूखंडाबाबत नोटीस देण्यात आली होती, परंतु मालमत्ताधारकांनी या नोटिशीला केराची टोपली दाखविली़ त्यानंतर बुधवारी मारुती कोंडिबा मुळे यांचे क्रमांक १ ते १६ प्लॉट १ लाख ७४ हजार ८६० रुपयांच्या थकबाकीसाठी महापालिकेने जप्त केले़ तर सतीशचंद्र शंकरराव गिरी यांच्या १५ प्लॉटवरील १ लाख ४१ हजार ६२० रुपयांच्या थकित करासाठी भूखंड जप्त केले़ मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त संभाजी वाघमारे, संतोष कंदेवार, क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, सहाय्यक आयुक्त नितीन तोरणेकर, केरबा कल्याणकर, बळीराम एंगडे, सुरेश इंगोले, सतीश महाबळे, नागेश गिराम यांनी ही कारवाई केली़ थकित करापोटी यापुढेही भूखंड जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले आहे़