नांदेडमध्ये क्रिकेटवर सट्टेबाजी करणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:55 IST2018-10-26T00:54:41+5:302018-10-26T00:55:31+5:30
गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले असून शहरात आणखी कुठे क्रिकेटवर सट्टा चालू आहे काय? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

नांदेडमध्ये क्रिकेटवर सट्टेबाजी करणारे दोघे ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले असून शहरात आणखी कुठे क्रिकेटवर सट्टा चालू आहे काय? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्यननगर भागातील हनुमान मंदिरा नजिकच्या एका झाडाजवळ भाड्याच्या खोलीत सुधीर पाटील नावाची व्यक्ती क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवित असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. यावर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातील संबंधित ठिकाणी धाड टाकून सुधीर लक्ष्मण पाटील (वय ४२, रा. वैभवनगर) आणि पवन अशोक जाधव (वय २७, रा. भगिरथनगर) या दोघांना ताब्यात घेतले. सदर सट्टा लावण्याकरिता आणखी कोण सामिल आहे याबाबतची विचारणा केल्यानंतर सदर सट्याचे काम लातूर जिल्ह्यातील बाभूळगाव येथील मलंग सेठ यांना देत असल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. यावेळी घटनास्थळावरुन रोख १६ हजार रुपये, ६ मोबाईल, एक एलईडी टीव्ही आणि नोटबुकचे पान असा ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिघोर, उपनिरीक्षक वाघमारे, शाहू, जांबळीकर, पांगरीकर आदींनी केली.