लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:11+5:302021-05-16T04:17:11+5:30
नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे प्रवासावर प्रतिबंध आले आहेत. त्याचबरोबर लग्नसराई पुढे ढकलण्यात आली आहे. पाहुणेही एकमेकांच्या घरी जाण्याचे ...

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...
नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे प्रवासावर प्रतिबंध आले आहेत. त्याचबरोबर लग्नसराई पुढे ढकलण्यात आली आहे. पाहुणेही एकमेकांच्या घरी जाण्याचे टाळत आहेत. त्यात दरवर्षी उन्हाळ्यात आणि सणासुदीला सासरवाशिणीसाठी हक्काचे आणि मनाला नवी उर्मी देणारे ठिकाण म्हणजे माहेर.
परंतु गेल्या दीड वर्षापासून विवाहितांना माहेरी जाता आले नाही. बच्चे कंपनीलाही मामाच्या गावचा ओढा लागला. पाहुणे मंडळींना रसाळीला बोलाविण्याचा बेतही रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे नातेसंबधांत अशी ताटातुट झाली आहे. अनेक महिला तर लेकीला हूरहूर वाटू नये म्हणून काही दिवस सासरी जावून मुक्काम ठोकत आहेत. तर घरात लहान मुले असल्यामुळे अनेकांना तो मार्गही काढता आला नसल्याचे दिसून येत आहे.
माहेरी चुलत भावाचे लग्न होते. पत्रिका छापल्या नव्हत्या. परंतु निमंत्रण मिळाले होते. परंतु मोजक्याच लोकांना लग्नात उपस्थितीची परवानगी होती. त्यामुळे भावानेही येण्यासाठी जास्त आग्रह केला नाही. घरच्या घरीच विवाह सोहळा पार पडला. नाही तर त्याच्या लग्नासाठी मोठी तयारी केली होती.
- माया मंडगीकर
कोरोनामुळे सुखाच्या सर्वच क्षणावर पाणी फिरले आहे. दररोज माहेरच्या लोकांची आठवण होते. व्हिडीओ कॉल करुन त्यांना बोलते. परंतु माहेरला जावून काही दिवस राहण्यात वेगळाच आनंद मिळतो. हा कोरोना कधी संपेल आणि माहेरी कधी जाईल अशी अवस्था झाली आहे. - सीमा बुक्तरे
माहेरच्या लोकांचा नेहमी फोन येतो. कधी येणार इकडे अशी विचारणा होते. परंतु लॉकडाऊन वाढतच चालले आहे. माहेरीही शेजारी कोरोना बाधित आहेत. - प्रियंका राचलवार
लेकीला दीड वर्ष झाले पाहिले नाही. नातही आता मोठी झाली आहे. मोबाईलवर तिचे बोबडे बोल ऐकले कसतरी होते. परंतु पर्याय नव्हता. त्यामुळे काही दिवस मीच मग लेकीकडे जावून राहिले. दोघींनाही त्यामुळे बरे वाटले.
-सुलोचना कांबळे
पाहुण्यांच्या लग्नासाठी लेक आली होती. परंतु काही मिनिटेच बोलणे झाले. लग्न आटोपून परत ती गावी गेली. परंतु त्यानंतर लॉकडाऊनच लागले. त्यामुळे लेकीच्या भेटीचा योगच आला नाही. लॉकडाऊन संपताच लेकीला माहेरी बोलावून घेणार आहे. -प्रिया जोशी
कोरोनामुळे सगळ्यांनाच हैराण करुन सोडले आहे. गेल्या दीड वर्षात एकही पाहुणा घरी आला नाही. घरातील लग्न सोहळेही पुढे ढकलले आहेत. उन्हाळ्यात रसाळीसाठी तर जावई आणि मुलगी येईल अशी आशा होती. परंतु तेही शक्य झाले नाही.
-सागरबाई वानखेडे
सध्या शाळा बंदच आहेत. क्लासेसही ऑनलाईन आहेत. परंतु त्यानंतरही मामाच्या गावाला जाता येत नाही. दरवर्षी मामाच्या गावाला गेल्यावर मज्जा येते. पण आता घरातच अडकून पडावे लागते. त्यामुळे दिवसभर बोअर होते.
-दुर्वा कुमठेकर
मामाचे घर नांदेडलाच आहे. पण लॉकडाऊन असल्यामुळे जाता येत नाही. कधी तरी आईच घेवून जाते. परंतु तिथेही जास्त काळ थांबता येत नाही. बाहेर खेळायलाही मुले बाहेर पडत नाहीत. पप्पाला बाहेर फिरायला जावू म्हटले तर कोरोना आहे असे सांगतात.
-ओवी मोहिते
मामाच्या घरी खुप मज्जा येते. पण आता कोरोनामुळे आम्ही गावाकडे आलोत. त्यामुळे मामाच्या घरी खुप दिवस झाले गेलेच नाही. आजी-आजोबा फोनवर बोलतात. चॉकलेट घेवून देतो म्हणतात. पण पप्पा तिकडे नेत नाहीत.
-आन्वी वडगावकर