मुखेडच्या भाजपा आमदाराला मांजरी गावकऱ्यांनी घातला घेराव; विकासाबद्दल विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2024 00:02 IST2024-10-26T00:01:54+5:302024-10-26T00:02:14+5:30
यावेळी आमदार राठोड यांनी लोकांच्या भेटीगाठी न घेता तेथून काढता पाय घेतला. याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर फिरत आहे.

मुखेडच्या भाजपा आमदाराला मांजरी गावकऱ्यांनी घातला घेराव; विकासाबद्दल विचारला जाब
मुखेड (जि.नांदेड) : अतिवृष्टी झाली तेव्हा मांजरी येथील शेतकरी भेटायला आल्याने आमदाराने त्यांना सापत्न वागणूक दिली होती, तसेच गावाचाही विकास केला नाही, ना रस्ता ना पाणी, अशी अवस्था असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी भाजपचे आमदार डाॅ. तुषार राठोड यांना गावातून पिटाळून लावले. यावेळी शेकडो नागरिकांनी आमदारास गराडा घालत जाबही विचारला.
मुखेड तालुक्यातील मांजरी येथे शुक्रवारी संध्याकाळी आ. तुषार राठोड यांची गावभेट होती. यावेळी एका शेतकऱ्याने माझ्या घराकडे पाणीपुरवठा होत नसल्याचे माइकवर बोलताच सुरक्षारक्षकाने त्यास खडसावले. त्यावेळी गावातील इतर लोकांनी हे काय चालू आहे, म्हणून गोंधळ घातल्याने शेवटी आमदार महोदयांना गावातून निघावे लागले.
२५ ऑक्टोबर रोजी मांजरी येथील मोकळ्या जागेवर आमदार राठोड यांची सभा पार पडली; पण यातील शेतकरी धोंडिबा माचेवाड यांनी स्टेजवरील माइकवर माझ्या घराकडे पाणीपुरवठा होत नाही, याचे उत्तर द्यावे, असा जाब आ. राठोड यांना विचारल्यानंतर ग्रामस्थांनी समाजावण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षारक्षकाने त्यास मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे गावातील अन्य नागरिक शेतकऱ्याच्या मदतीला धावले. आमदार साहेब ५ वर्षांपासून गावातील कुठलाही प्रश्न सोडविला नसून, पूरपीडित लोकांचे शेतात दगडगोटे वाहून आले असून, आम्हाला तुम्ही भेट का दिली नाही, असा जाब विचारला. यावेळी आमदार राठोड यांनी लोकांच्या भेटीगाठी न घेता तेथून काढता पाय घेतला. याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर फिरत आहे.