महावितरणमधील यंत्रचालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST2021-01-15T04:15:49+5:302021-01-15T04:15:49+5:30
नांदेड - महावितरण विभागातील वीज उपकेंद्रे देखभाल, दुरूस्ती व प्राथमिक सोयी-सुविधांअभावी धोकादायक बनली असून, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात ...

महावितरणमधील यंत्रचालकांचे आंदोलन
नांदेड - महावितरण विभागातील वीज उपकेंद्रे देखभाल, दुरूस्ती व प्राथमिक सोयी-सुविधांअभावी धोकादायक बनली असून, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेच्यावतीने १९ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. महावितरणमधील औरंगाबाद प्रादेशिक विभाग कार्यालयांतर्गत आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातील सर्व वीज उपकेंद्रात ऑपरेटर्सची संख्या अपुरी आहे. गरज असूनही सुरक्षारक्षकांची नियुक्ती होत नाही. कंपनीची गरज म्हणून अनेकवेळा ऑपरेटर्सना अतिरिक्त काम करावे लागते. परंतु, या कामाची देयके प्रादेशिक विभागात देण्यात येत नाहीत. कंपनीच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी परिपत्रक काढून अतिकालीन कामावर व त्याच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यात यावे, बाह्य यंत्रचालकांचा पूल करावा, मागील अतिकालीन कामाची देयके तत्काळ निकाली काढा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, यामुळे केवळ अतिकालीन कामाची देयके थांबविण्यात आली. प्रत्यक्षात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले नाही. परिणामी ऑपरेटर्सना अतिरिक्त काम करावेच लागले आहे. त्याची देयके देण्याची संघटनेची मागणी असल्याचे सरचिटणीस नवनाथ पवार यांनी सांगितले. दरम्यान, १९ जानेवारी रोजी साखळी उपोषणाने या आंदोलनाला सुरूवात करण्यात येणार असून, आठ जिल्ह्यांतील संघटनेचे पदाधिकारी, सभासद यामध्ये सहभागी होणार असल्याचे औ. प्रा. वि. औरंगाबाद अध्यक्ष एम. एन. गोरखवाड यांनी कळविले आहे.