तब्बल १८ तासांनी सापडला मायलेकीचा मृतदेह, पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 07:13 IST2018-06-25T07:13:05+5:302018-06-25T07:13:17+5:30

येथून जवळच असलेल्या शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात २३ जून रोजी दुपारी आईने दोन चिमुकल्यांसह उडी घेवून आत्महत्या केली होती

Mother's body found in 18 hours, her husband's arrest | तब्बल १८ तासांनी सापडला मायलेकीचा मृतदेह, पतीला अटक

तब्बल १८ तासांनी सापडला मायलेकीचा मृतदेह, पतीला अटक

धर्माबाद (जि. नांदेड) : येथून जवळच असलेल्या शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात २३ जून रोजी दुपारी आईने दोन चिमुकल्यांसह उडी घेवून आत्महत्या केली होती. त्यातील एका मुलीचा मृतदेह शनिवारी सापडला होता. त्यानंतर तब्बल १८ तासानंतर रविवारी आई व दुसऱ्या मुलीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलवाडी येथील आचारी व्यवसाय करणारा यादव श्रीनिवास कांबळे याच्या हुंड्याच्या त्रासाला कंटाळून पूजा ऊर्फ रिंकूबाई यादव कांबळे (३२) हिने शिवानी (६), सुविद्या यादव कांबळे (३) या दोन मुलींना घेऊन शनिवारी शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

शनिवारी सायंकाळी सुविद्याचा मृतदेह सापडला होता. परंतु, पूजा व शिवानी यांचा मृतदेह सापडला नव्हता. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने कुंडलवाडी पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. सकाळी आठच्या सुमारास गोदावरी नदीच्या उत्तरेस दहा किलोमीटर अंतरावर दोन्ही मृतदेह आढळून आले. प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी मयत पूजा कांबळे हिचे वडील चांदू गणपती वाघमारे (५५ रा.तेल्लूर ता.कंधार) यांच्या फिर्यादीवरून आरोपी यादव श्रीनिवास कांबळे याच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली.

Web Title: Mother's body found in 18 hours, her husband's arrest