जिल्ह्यात मुक्तीसंग्राम दिनी मेगा कोविड लसीकरण कॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:24 IST2021-09-16T04:24:08+5:302021-09-16T04:24:08+5:30
नांदेड : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्ह्यात एकाच दिवशी ७५ हजार नागरिकांचे कोरोना ...

जिल्ह्यात मुक्तीसंग्राम दिनी मेगा कोविड लसीकरण कॅम्प
नांदेड : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्ह्यात एकाच दिवशी ७५ हजार नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दि. १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा केला जाणार आहे. त्याचवेळी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला जात आहे. मुक्तीसंग्राम दिनी या दोन्ही दिनांचे औचित्य साधून जिल्ह्यात हा मेगा कोविड लसीकरण कॅम्प घेतला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका कार्यक्षेत्रातील इतर शासकीय रुग्णालये, आरोग्य अधिकारी यांनी या मोहिमेंतर्गत नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांनी गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील १६ नगरपालिका कार्यक्षेत्रातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये असे मिळून एका दिवसात ३२ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत तयारी करावी. त्याचवेळी ग्रामीण कार्यक्षेत्रात १६ तालुक्यांमधील ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी यांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन १७ सप्टेंबर रोजी अर्थात मुक्ती संग्रामदिनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर ७५० नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे. ग्रामीण कार्यक्षेत्रात एका दिवसात ५१ हजार नागरिकांचे लसीकरण होईल, याबाबत संकल्प करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातही सर्व प्रभागांमध्ये सूक्ष्म नियोजन करत किमान १० हजार नागरिकांचे लसीकरण होईल, याबाबत वैद्यकीय अधिकारी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात मुक्ती संग्रामदिनी जवळपास ९३ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरीही ७५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना सर्व विभागांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले असले, तरीही आणखी मोठा पल्ला गाठायचा असल्याचे डॉ. इटनकर म्हणाले.