नांदेड : गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे कंबरडे मोडले असून, ते आता शेवटच्या घटका मोजताहेत. त्यामुळे ते निराश झाले असून, या नैराशातूनच त्यांनी पोलिसांच्या खबऱ्या असल्याच्या संशयातून एकाची हत्या केली आहे. परंतु ही हत्या करणाऱ्यांवर महिन्याभराच्या आत कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
रविवारी हदगाव येथील श्रीकृष्ण उखळाई मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. ते म्हणाले, गडचिरोली माओवादी निराश झाले आहेत. त्यामुळे ते सातत्याने शरण येत आहेत. जे शरण येत नाही ते निष्क्रिय झाले आहेत. माओवाद हा शेवटच्या घटका मोजत असून, त्या नैराशातूनच त्यांनी एका तरुणाची हत्या केली आहे. ही हत्या करणाऱ्यांचाही लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच शक्तिपीठ महामार्गाला कुणाचाही विरोध नाही. मी आताच सर्व आमदारांची चर्चा केली. आमदारांनीही सांगितले की या महामार्गाला विरोध नाही. आमदार मंडळी कृती समितीला घेऊन माझ्याकडे चर्चेसाठी येणार आहेत. त्यावेळी कृती समितीही आमचा विरोध नसल्याचेच सांगेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.