प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले! - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST2021-05-17T04:16:15+5:302021-05-17T04:16:15+5:30
खा. सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व ...

प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले! - अशोक चव्हाण
खा. सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते.
खा. राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबीयाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
युवा पिढीचा दिशादर्शक हरवला : राजूरकर
उच्चशिक्षित, साधी राहणीमान आणि अभ्यासूवृत्ती अशी खा. राजीव सातव यांची ओळख. अत्यंत सालस, अत्यंत राजस, राजबिंडा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या एका राजकीय पक्षाचा नेता अशा महामारीत जाणे क्लेशदायक आहे. राजीव सातव यांच्या रूपाने युवा पिढीचा दिशादर्शक हरविला आहे. अभ्यासू, कर्तबगार आणि तितकाच लोकाभिमुख विचार करणारा पारदर्शक नेता म्हणून जनता त्यांच्याकडे आदराने पाहत होती. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला - खा. चिखलीकर
खा. राजीव सातव यांच्या निधनाची बातमी कळताच धक्काच बसला. हिंगोलीसारख्या मागास भागातून स्वबळावर नेतृत्व उभे करत ते महाराष्ट्रसह दिल्लीतही आपली छाप टाकत काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. राज्यसभेतही त्यांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत उपस्थित केलेली चर्चा लक्षवेधी ठरत होती. अत्यंत उमेदीच्या काळात कोरोनाने खा. राजीव सातव यांचा घात केला. खा. राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. -खा.प्रताप पाटील चिखलीकर