मुखेड (जि. नांदेड) : लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या पाचपैकी तीन महिलांचे मृतदेह सायंकाळी हाती लागले. तर अद्यापही दोघींचा शोध लागू शकला नाही, गंगाबाई गंगाराम मादळे (वय ६०), भीमाबाई हिरामण मादळे (५५) यांचा मृतदेह सायंकाळी ४ वाजता आढळला. त्यानंतर तासाभराने ललिताबाई भोसले यांचा मृतदेह हसनाळ (प.मु.) येथून काढण्यात आला.
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंतरराज्यीय लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील रावणगाव, हासनाळ, भासवाडी आणि भिंगेली ही चार गावे पाण्याखाली गेली होती. नुकतेच घळभरणी झालेल्या लेंडीचे बॅकवॉटर या गावात घुसले होते. रात्री अंधारातच साखर झोपेत असलेल्या नागरिकांना जीव वाचविण्यासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून धावपळ करावी लागली.
सोमवारी दुपारपर्यंत बचाव पथकाने २०० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले होते. दिवसभर बचावकार्य सुरूच होते. पुरात कारमधील तीन महिला बेपत्ता झाल्या असून हासनाळ येथील पाच ते सात जणांचा अद्यापही संपर्क झाला नाही. बचाव कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाला पाचारण करण्यात आले होते.
लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे दीड ते दोन वाजेच्या सुमारास बुडीत क्षेत्रातील रावणगाव, हासनाळ, भासवाडी आणि भिंगेली या चार गावांमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली होती. झोपेत असलेल्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांनी अंधारातच उंच ठिकाणांकडे धाव घेतली, तर म्हाताऱ्या मंडळींना छातीपर्यंतच्या पाण्यातून युवकांनी बाहेर काढले; परंतु चालताही येत नसलेली काही म्हातारी मंडळी घरातच थांबली होती.
पहाटे चार वाजेपासून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. जवळपास तीनशेहून अधिक जणांना दुपारपर्यंत बाहेर काढण्यात आले. अद्यापही शेकडो जण पाण्यात अडकून आहेत. त्यांच्या बचाव कार्यासाठी आता सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोमवारीही नांदेड आणि लातूर जिल्ह्याला ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तेलंगणाच्या प्रधान सचिवांशी संपर्क करून पोचमपाड धरणातून पाणी विसर्गावर चर्चा केली. सोमवारी दिवसभर पाऊस थांबला असला, तरी रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
तीन महिला बेपत्ता, सात जणांशी संपर्कच नाही
दगीर येथील तीन महिला एका मुलासह करीमनगरकडे कारमधून जात होत्या. यावेळी रावी येथील नाल्याच्या पुरात कार आणि तीन महिला वाहून गेल्या; परंतु कारमधील मुलगा मात्र बचावला. या तिन्ही महिलांचा शोध सुरू आहे. हासनाळ येथील पुरात अडकलेल्या पाच ते सात जणांचाही अद्याप संपर्क झाला नव्हता. ही सर्व मंडळी वयोवृद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले आहेत. रात्रीच्या वेळी रावणगाव येथील राजू पाटील यांच्या वाड्यावर तब्बल ३०० नागरिकांनी आश्रय घेतला होता, तर कुणी मशीद, तर कुणी झाडावर चढून जीव वाचविला.
दोनशेहून अधिक पशुधन मृत्युमुखीमुखेड तालुक्यातील चार गावांतील शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, बैल, असे दोनशेहून अधिक पशुधन या पुरात मृत्युमुखी पडले आहे. मुक्रमाबाद येथील बालाजी खंकरे या शेतकऱ्यांच्या तब्बल ४० म्हैस मरण पावल्या आहेत. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढावले आहे.
घळभरणीमुळे परिस्थिती ओढावलीपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी शिरले आहे. या पुरात हासनाळ येथील पाच ते सात जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. लेंडी धरणाची घळभरणी करण्यापूर्वी गावांचे पुनर्वसन करण्याची गरज होती; परंतु फौजफाटा लावून पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील दहा ते बारा गावांत पाणी शिरले आहे, असा आरोप खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.