प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:44 IST2017-12-16T00:44:22+5:302017-12-16T00:44:32+5:30
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि शासनाने दिलेल्या १५ डिसेंबर या डेडलाईनपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात खड्ड्यांसाठी खर्च केलेला कोट्यवधींचा खर्च खड्ड्यातच गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ डेडलाईननंतरही जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे ‘जैसे थे’ च्या स्थितीत आहेत़ त्यामुळे खड्डे बुजविण्याचा केवळ फार्स असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत़

प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे जैसे थे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि शासनाने दिलेल्या १५ डिसेंबर या डेडलाईनपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात खड्ड्यांसाठी खर्च केलेला कोट्यवधींचा खर्च खड्ड्यातच गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ डेडलाईननंतरही जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे ‘जैसे थे’ च्या स्थितीत आहेत़ त्यामुळे खड्डे बुजविण्याचा केवळ फार्स असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत़
नांदेड जिल्ह्यातील राज्य, प्रमुख राज्यमार्गावर १ हजार ४७७ किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडले होते़ त्यापैकी संपूर्ण खड्डे बुजविण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातून सांगण्यात येत आहे़ परंतु, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे़
जिल्ह्यात २ हजार ६५७ किलोमीटर लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहे़ त्यापैकी १६२८़४५ किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडले असून आजपर्यंत केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले आहे़ परिणामी शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी झाल्याचे दिसते़ जिल्ह्यात देगलूर, नांदेड आणि भोकर असे तीन उपविभागांतर्गत काम करण्यात येते़ सा़ बां़ च्या आकडेवारीनुसार भोकर विभागातील रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे पडलेले आहेत़ देगलूर विभागातील ११४४ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्गांपैकी ५८१़९७ किमीवर खड्डे पडले आहेत़
या विभागातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे़ जिल्हा परिषदेने देगलूर विभागात सर्वाधिक ८२१ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करून दिले आहेत़
राज्यभरातील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्यानंतर सर्वत्र खड्डे बुजविण्याचा सपाटा सुरू झाला़ परंतु, उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात कामाच्या दर्जाबाबत तडजोड करण्यात आल्याचे दिसते़ खड्डे बुजविलेत की त्यात गिट्टी आणि चुरी टाकली? असा प्रश्न पडत आहे़ खड्डे बुजल्यानंतर अगोदरच्या रस्त्यापेक्षा बुजलेल्या खड्ड्यांची उंची अधिक झाल्याने स्पीड ब्रेकर तयार झाले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास आदळआपट करीतच होत असून नेमके खड्डे कुणाचे बुजले? असा प्रश्न उपस्थित होत आहे़
जिल्हा परिषदेच्या रस्त्याची झाली होती चाळणी
४जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील एकूण १६९४ किलोमीटरचे रस्ते सा़बां़विभागाकडे हस्तांतरित करून दिले आहेत़ जिल्हा परिषदेकडून आजपर्यंत रस्त्याच्या डागडुजीचे काम व्यवस्थित न केल्यामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत असल्याची ओरड सा़बां़ विभागाकडून केली जात आहे़ जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्गावर रस्ता झाल्यानंतर दहा -दहा वर्षांपर्यत गिट्टीचा खडादेखील येवून पडलेला नाही़ त्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते ? अशी अवस्था काही ठिकाणच्या रस्त्याची आहे़