'KBC' case runs fast | ‘केबीसी’चा खटला जलदगतीने चालवा
‘केबीसी’चा खटला जलदगतीने चालवा

ठळक मुद्देगुंतवणूकदारांचे शासनाला साकडे पाच वर्षांपासून सुरू आहे खटला

नांदेड : केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला जलदगतीने चालवून गुंतवणूकदारांना रक्कम परत करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी शासनाकडे केली आहे़
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केबीसी कंपनीचे मुख्य मालक व संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण व कविता चव्हाण तसेच इतर १३ संचालकांनी मिळून १ हजार ३२ करोड रूपये जमा करून एजंटांना ८५३ कोटी कमीशन देवून व कंपनी बंद करून सिंगापूरला पळून गेले होते़ त्यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिल्या होत्या़ शासनाने निर्णय घेवून नाशिकच्या आयुक्तांनी सर्व रक्कम जप्त करून आपल्याकडे सुरक्षित ठेवली आहे़
२०१४ पासून ही रक्कम अडकून पडली आहे़ त्यामुळे गुंतवणूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे़ कंपनी संचालकाविरूद्ध नांदेड, परभणी अशा २२ ठिकाणी न्यायालयात गुन्हे दाखल केलेले आहेत़ त्यामध्ये सर्व १४ आरोपी अद्याप हजर झालेले नाहीत़ न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे़ शासनाने हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यासाठी मंजुरी दिली आहे़ मात्र त्याचा उपयोग होत नसल्याचे गुंतवणूकदारांनी निवेदनात म्हटले आहे़
समिती गठीत करण्याची गुंतवणूकदारांची मागणी
शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी मंजुरी दिली असली तरी त्याचा उपयोग होताना दिसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे़ शासनाने केबीसी कंपनीची रक्कम परत करण्यासाठी समिती गठित करावी, तसेच २२ ठिकाणी सुरू असलेले खटले नांदेडमध्ये जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे़ निवेदनावर स़ गगनसिंघ, कालुसिंघ गाडीवाले, महिंद्रसिंघ रागी, बाबूसिंघ कारपेंटर, हरमीतसिंघ निर्मले, महिंदसिंघ पैदल, गोविंदसिंघ विष्णूपुरीकर, मोहनकौर भोसीवाले आदी गुंतवणूकदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत़


Web Title: 'KBC' case runs fast
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.