कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल पुरस्कार, लोकमतचा सततचा पाठपुरावा फळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 17:35 IST2021-01-23T17:34:13+5:302021-01-23T17:35:33+5:30
या निवडीसाठी लोकमतसह खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता.

कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल पुरस्कार, लोकमतचा सततचा पाठपुरावा फळाला
कंधार, जि. नांदेड: घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (घोडजकर) या बालकाने जीवाची बाजी लावत मानार नदीच्या अथांग पाण्यात बुडणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले होते. त्याच्या या धाडस, शौर्याची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या निवडीसाठी लोकमतसह खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता. घोडज, ता. कंधार येथील मनोविकास विद्यालयात शिकणारे तीन विद्यार्थी २२ फेब्रुवारी २०२० रोजी ऋषी महाराज मंदिरात दर्शनासाठी आले होते. तत्पूर्वी आंघोळीसाठी तिघे जण जवळच असलेल्या मानार नदीवरील धोबीघाटावर गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडत होते. बुडत असताना होणारा आवाज जवळ असलेल्या म. फुले माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कामेश्वर वाघमारे याच्या कानावर पडला. क्षणाचाही विलंब न करता त्याने पाण्यात उडी मारली. पाण्यात बुडत असलेल्या आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून जीवाची बाजी लावून कामेश्वर याने बाहेर काढले. मात्र ओम मठपती या विद्यार्थ्याचे प्राण वाचविता आले नसल्याचे शल्य कामेश्वर याला बोचत राहिले.
तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास जाधव, व्ही.आर. राठोड, सुनील पत्रे आदींनी कौतुक करत सहकार्य केले. हा विषय हाती घेऊन पुरस्काराचा प्रस्ताव तयार करावा, यासाठी लोकमतने पाठपुरावा केला. ग्रामपंचायत घोडज, स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांनी निवेदनाद्वारे पुरस्कार देण्याची मागणी केली. खा. प्रताप पा. चिखलीकर यांनीही प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. आ. श्यामसुंदर शिंदे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींनी कौतुक करत प्रस्ताव सादर करण्यास संबंधितांना सांगितले. तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी जिल्हाधिकारी, महिला व बालविकास विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर केला होता.
कामेश्वर वाघमारे याने ११ महिन्यांपूर्वी केलेल्या साहसाची दखल केंद्र सरकारने घेतली. २२ जानेवारी २०२१ रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे. हे वृत्त धडकताच घोडजसह जिल्हाभरातून कामेश्वरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्यापेक्षा उंच व वजनाने जास्त असलेल्या २ मुलांचे प्राण वाचविणाऱ्या कामेश्वरला आर्थिक आधार देऊन उच्च शिक्षणासाठी मदतीची गरज आहे.