माओवाद्यांच्या भ्याड हल्यात नांदेडचा जवान शहिद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 19:40 IST2021-08-20T19:39:26+5:302021-08-20T19:40:07+5:30
सुधाकर शिंदे आणि गुरुमुख सिंह हे इंडो तिबेटीयनचे जवान शुक्रवारी दुपारी छत्तीगडमधील नारायणपूर येथे करिया मेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेले होते.

माओवाद्यांच्या भ्याड हल्यात नांदेडचा जवान शहिद
नांदेड- जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या बामणी येथील सुपूत्र आणि इंडो तिबेटीयन बटालियनचे सहायक सेनानी सुधाकर शिंदे हे माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहिद झाले आहेत. शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गडचिरोली नजीक नारायणपूर येथे ही घटना घडली. त्यामुळे बामणी गावावर शोककळा पसरली आहे.
सुधाकर शिंदे आणि गुरुमुख सिंह हे इंडो तिबेटीयनचे जवान शुक्रवारी दुपारी छत्तीगडमधील नारायणपूर येथे करिया मेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेले होते. यावेळी माओवाद्यांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. यावेळी दाेघांनीही चोख प्रत्युत्तर दिले. परंतु माओवाद्यांची संख्या जास्त असल्यामुळे दोघेही शहिद झाले. हल्यानंतर माओवाद्यांनी त्यांच्या जवळील एके ४७आणि वॉकीटॉकीही लंपास केली. सुधाकर शिंदे हे मुखेड तालुक्यातील बामणी येथील रहिवाशी आहेत. मुक्रमाबाद येथील डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयातील त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर परभणीच्या कृषी विद्यापीठातून ते बीएसस्सी ॲग्री झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे बामणी गावावर शोककळा पसरली आहे.