जलजीवन ते बदली प्रक्रिया; नांदेड जि.प.मधील अनागोंदीची 'पंचायत राज समिती'कडे तक्रार
By श्रीनिवास भोसले | Updated: September 25, 2025 11:36 IST2025-09-25T11:27:11+5:302025-09-25T11:36:25+5:30
चौकशीच्या मागणीने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; नांदेड जिल्हा परिषदेतील अनेक 'अनियमित बाबी' चव्हाट्यावर येणार

जलजीवन ते बदली प्रक्रिया; नांदेड जि.प.मधील अनागोंदीची 'पंचायत राज समिती'कडे तक्रार
नांदेड: जिल्हा परिषदांची निवडणूक तीन वर्षांपासून रखडल्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती असून, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्याने जिल्ह्यात प्रशासन मनमानी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत अशाच स्वरूपाच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत.
विशेषतः जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत अनियमितता, अपारदर्शकता आणि अपंग लाभ घोटाळा यांसारख्या तक्रारी मिळत असून, जिल्हा परिषदेतील प्रशासकांवर मनमानी कारभार चालवण्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर, नायगावचे आमदार राजेश पवार यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष रावसाहेब दानवे यांची मुंबईत भेट घेऊन नांदेड जिल्हा परिषदेतील जलजीवन मिशन, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, घरकुल योजना, बांधकाम विभाग व बदली प्रक्रियेतील तक्रारींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तक्रारींमध्ये ग्रामपंचायतीतील अनागोंदी कारभार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्यालयी अनुपस्थित राहणे, निधीच्या वितरणातील पारदर्शकतेचा अभाव अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. चर्चेदरम्यान पंचायत राज समितीने लवकरात लवकर नांदेड जिल्हा दौरा आयोजित करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. समितीने चौकशी सुरू केल्यास अनेक अनियमित बाबी चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.