‘महिला लेखन व समीक्षा’ विषयावर अंतरराष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:11+5:302021-04-15T04:17:11+5:30
नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ...

‘महिला लेखन व समीक्षा’ विषयावर अंतरराष्ट्रीय चर्चासत्र
नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ‘महिला लेखन व समीक्षा’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात देशविदेशातील महत्वाच्या स्त्री अभ्यासक सहभागी होणार असून इंग्लिश आणि परकीय भाषा विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. माया पंडित यांच्या बीजभाषणाने चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधार व सुप्रसिद्ध लेखिका सोना चौधरी आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन या समारोप समारंभास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि. १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२१ या कालावधीत हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित होत असून आंतरजालीय दृक्श्राव्य प्रणालीद्वारे निमंत्रित वक्ते विषय मांडणार आहेत. १५ एप्रिल रोजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. सुप्रसिद्ध अनुवादक आणि इंग्रजी भाषेच्या विद्वान डॉ. माया पंडित या बीजभाषण करतील. नांदेड महानगरपालिकेच्या महापौर मोहिनीताई येवणकर, प्र- कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वैजयंता पाटील आणि मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पंचशील एकबेकर यांची यावेळी मुख्य उपस्थिती असणार आहे. चर्चासत्रात बॅरिस्टर अर्चना माढेकर (टोरंटो, कॅनाडा), शिरीन कुलकर्णी (ताम्पेरे, फिनलँड), ऍड. शिल्पा गडमडे (फ्रँकफर्ट, जर्मनी), डॉ. रति सक्सेना (त्रिवेंद्रम, केरळ), डॉ. तेजस्विनी कुरुंदकर (दिल्ली), डॉ. अरुणा सबाने (नागपूर), डॉ. निलांबरी जगताप (कोल्हापूर), डॉ. स्वाती दामोदरे (अकोला), प्रा. विद्या सुर्वे बोरसे (नाशिक), प्रा. स्वाती मदनवाड (अर्धापूर) तीन भिन्न सत्रांमध्ये आपले विचार मांडणार असल्याचे समन्वयक डॉ. पृथ्वीराज तौर, भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर यांनी सांगितले.