जोमात आलेले सोयाबीन नासल्याने वर्ष काढावे कसे? शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:11 PM2019-11-06T12:11:48+5:302019-11-06T12:15:31+5:30

शेतकरी म्हणतात...यंदा दिवाळी साजरी झालीच नाही !

How to make a year out of being consumed by soybeans that are damaged ? Farmers worried | जोमात आलेले सोयाबीन नासल्याने वर्ष काढावे कसे? शेतकरी चिंतेत 

जोमात आलेले सोयाबीन नासल्याने वर्ष काढावे कसे? शेतकरी चिंतेत 

googlenewsNext
ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील व्यथा  कापसाचीही झाली माती

- सुनील चौरे 

हदगाव (जि. नांदेड) : मनाठा-वरवंट शिवारातील शेतकऱ्यांची यंदा दिवाळी साजरी झालीच नाही. परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे उभे सोयाबीन भिजून कोंब फुटले. कापून ठेवलेले सोयाबीन जमा करण्यापूर्वीच शेतामध्ये तळे साचले. कुठे अर्धे सोयाबीन जमा झाले तर कुठे शेतामध्येच विखुरलेले राहिले. यामुळे शेतकऱ्यांची घाळण झाली. काढलेल्या सोयाबीनला दोन हजार रुपये बाजारभाव मिळाला. यात वर्ष काढावे कसे अन् घर चालवावे कसे? या चिंतेत शेतकरी आहेत.

वरवंट शिवारातील राजेश्वर वाठोरे, मधुकर वाठोरे यांचे सोयाबीन संपूर्ण शेतामध्ये विखुरलेले होते. ढीग जमा केला तर मळणीयंत्र चिखलामध्ये जात नाही. प्रयत्न करुन सोयाबीन काढले तर बाजारात सोयाबीन ओले व काळे पडल्याने भाव मिळत नाही, असे त्यांंनी सांगितले. मनाठा शिवारातील धोंडबा बोईनवाड, शिवाजी बोईनवाड यांचेही प्रचंड नुकसान झाले. दोन एकर घरची जमीन व दोन एकर खंडण केली. या दोन्ही शेतातील सोयाबीन पावसाने चिंब भिजले.  कसेतरी सोयाबीन काढले. सुंदराबाई  बोईनवाड म्हणाल्या, आमची दिवाळी यंदा झालीच नाही. हातात एक पैसा नाही.  सोयाबीन एकत्र जमविणे, ढीग झाकून ठेवणे, दररोज उघडणे यामध्ये दिवाळी गेली. सोयाबीन ७० टक्के नासले आहे, असेही त्या म्हणाल्या.

कापसाचे पीकही नाजूक असते. त्याला कमी वा जादा पाऊस जमत नाही.  शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने फुटलेल्या बांधामध्ये बांध फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. आपबिती सांगताना त्यांचा ऊर दाटून येत होता. वर्षाचे गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांनी जवळचे पैसे शेतात टाकले. सुगी आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास हिरावून घेतला. शासनाने  आर्थिक मदत देण्याची गरज आहे, असे शेतकरी बोलून दाखवित आहेत.   तलाठ्यांनी स्पॉट पंचनामे केले. काही शेतावर ते गेले, मात्र शेजारच्या शेतात जाण्याचे टाळल्याने नाराजी वाढली आहे.


माझ्या शेतात तीन बॅग सोयाबीन होते. ढीग मारुन ठेवला मात्र खालून वरुन पाणीच पाणी. शेतामध्ये चिखल असल्यामुळे मळणीयंत्र शेतात येत नाही. पाऊस थांबत नाही. सोयाबीन काढले. सोयाबीन भिजल्यामुळे आर्द्रता व काळे पडल्यामुळे प्रतिक्विंटल दोन हजार भाव लागला. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो.
-धोंडबा बोईनवाड


एक एकर वावर. यामध्ये एक बॅग सोयाबीन. शेजारी दोन एकर खंडण केले. यामध्ये दोन बॅग सोयाबीन होते. दोन्ही शेतात आताही चिखलच आहे. घरच्या शेतातील ७० टक्के सोयाबीन नासले तर केलेल्या शिवारातील ५० टक्के खराब झाले. पाऊस उघडला नाही तर आणखी १५ दिवस मळणीयंत्र शेतात येत नाही.  पाऊस पडला तर काहीच हाती लागत नाही. खंडण केलेल्या शेतामध्ये तर नुकसानच नुकसान झाले.
-सुंदराबाई बोईनवाड

पावसामुळे खूप घाळण झाली.  पीकपाणी बरे होते. तोंडाला आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला. दिवाळी आमची शेतातच झाली. हातात रुपयाही नाही. -अनिल सोनाळे, मनाठा

Web Title: How to make a year out of being consumed by soybeans that are damaged ? Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.