मुखेडमध्ये नाली खोदकामात आढळले ऐतिहासिक कोरीव दगड
By प्रसाद आर्वीकर | Updated: December 8, 2023 13:48 IST2023-12-08T13:22:09+5:302023-12-08T13:48:57+5:30
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तर शहरातील हा ऐतिहासिक ठेवा पुनरुज्जीवीत होऊ शकतो.

मुखेडमध्ये नाली खोदकामात आढळले ऐतिहासिक कोरीव दगड
- शेखर पाटील
मुखेड : शहरात नाली बांधकामासाठी सुरू आसलेल्या खोदकामात ऐतिहासिक कोरीव दगड आढळले आहेत. साधारणता शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे हे दगड असावेत, असे प्रथमदर्शनी दिसते.
येथील विठ्ठल मंदिर गल्ली भागात नगरपालिकेच्या वतीने नाली बांधकामासाठी खोदकाम केले जात आहे. चार दिवसांपासून हे काम सुरू असून, गुरुवारी खोदकाम करीत असताना साधारणतः साडेपाच फूट खोल कोरीव दगड (ऐतिहासिक शिळा) आढळल्या आहेत. साधारणपणे शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे हे दगड असावेत. हे दगड जमिनीखाली कसे गाडल्या गेले? याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. विठ्ठल मंदिर गल्ली ही मुखेड शहरातील जुनी वसाहत आहे.
या ठिकाणी साधारणता ४० वर्षांपूर्वी पालिकेच्यावतीने नाली बांधकाम झाले होते. या नाली बांधकामापूर्वीपासूनच जमिनीत हे पुरातन दगड असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान खोदकामात सापडलेले दगड नेमके किती वर्षांपूर्वीचे आहेत? कोणत्या कालखंडातील आहेत ? याबाबतची माहिती मात्र मिळू शकली नाही. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तर शहरातील हा ऐतिहासिक ठेवा पुनरुज्जीवीत होऊ शकतो.