नांदेड शहरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात सध्या २६ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला. अनेक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे; परंतु मदतीचा ओघ कमी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना इतर सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. यापूर्वी वृद्धाश्रमात अनेकजण वाढदिवस, विविध उपक्रम राबवीत असे. मात्र, आता कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यातच आता वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अगोदरच कोणी याठिकाणी जात नसल्याचे चित्र होते. आता कोरोना वाढल्याने कोणीही मदत करण्यासाठी पुढे येत नाही. तसेच वृद्धाश्रमात दाखल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे नातेवाईकही मागील दोन महिन्यांपासून भेटीला आले नाहीत. त्यामुळे वृद्धाश्रमातील आजी, आजोबा एकाकी पडले आहेत. कोरोनामुळे दररोज अनेक रुग्ण मृत्यू होत आहेत. आपले नातेवाईक सुखाने राहावेत, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक दररोज प्रार्थना करत आहेत.
चौकट- वृद्धाश्रमातील एकूण सदस्य- २६, स्त्री -२२, पुरुष - ४
चाैकट- भेट देणारे शून्यावर
यापूर्वी वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक, राजकीय नेते या वृद्धाश्रमाला भेटी देऊन आर्थिक किंवा साहित्याच्या स्वरूपात मदत देत असे. मात्र, आता कोणीही या वृद्धाश्रमाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे वृद्धाश्रमानेच या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला आहे.
चौकट- मदतही आटली
वृद्धाश्रमांना शासनाकडून अल्प अनुदान दिले जाते; परंतु ते वेळेत न देता चार, पाच वर्षांनी मिळते. त्यामुळे हे वृद्धाश्रम देणग्या तसेच मदतीवर चालविले जाते. सध्याच्या काळात वृद्धाश्रामातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना योग्य आहार व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अडचणी येत आहेत.
चाैकट-१. या महामारीने माणूस माणसात राहिला नाही. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे आमच्याकडे कोण लक्ष देणार; परंतु आम्ही या वृद्धाश्रमात खूप आनंदी आहोत. आता हेच आमचे खरे घर आहे.
२. खऱ्या नातेवाइकांनी घराबाहेर काढले तरी कोरोनामुळे आम्हाला त्यांचीच काळजी वाटते. त्यांनी आम्हाला विचारले नाही तरी चालते; परंतु ते सुखाचे राहावेत. एवढीच आमची इच्छा आहे. इथे तर आमची सगळी सोय आहे.
३. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते खूप चांगले आहे. आज आम्ही एकाकी असलो तरी आमच्या सुख-दु:खाची काळजी घेणारे लोक या ठिकाणी आहेत. आमच्या नशिबातच होते या ठिकाणी येण्याचे, त्याला कोण काय करणार.