आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:01+5:302021-04-19T04:16:01+5:30
दोन कर्मचारी पॉझिटिव्ह लोहा - बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मारतळा येथील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ...

आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत
दोन कर्मचारी पॉझिटिव्ह
लोहा - बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मारतळा येथील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात जावून कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. मारतळा परिसरात आतापर्यंत ५८ बाधित रुग्ण आढळले आहेत. बँकेतील रोखपाल व क्लार्क बाधित आढळले. ग्राहकांनी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन शाखा व्यवस्थापक भूपेश कुमार यांनी केले आहे.
मोफत ऑटो सेवा
नांदेड - कोरोना रुग्ण व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयासाठी नीलेश डोंगरे या युवकाने मोफत ऑटो सेवा सुरू केली आहे. नीलेश हा तलवारबाजीचा माजी खेळाडू आहे. भाड्याने ऑटो घेऊन तो लोकांची मोफत सेवा करत आहे. या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे.
६९ हजारांची दारू लंपास
किनवट - तालुक्यातील सारखणी येथील एका दुकानातून ६९ हजार रुपये किमतीची देशी दारू चोरीला गेली. १४ एप्रिलला रात्री ही घटना घडली. सिंदखेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. संदीप सिद्धेवार यांच्या दुकानात ही चोरी झाली. तपास जमादार पठाण करत आहेत.
लघुउद्योजकांवर उपासमार
अर्धापूर - कोरोनामुळे अर्धापूर तालुक्यातील लघुउद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात अनेक लघुउद्योग सुरू होते. त्यामध्ये हॉटेल, खानावळ, पानटपरी आदींचा समावेश आहे. कोरोनामुळे हे सर्व बंद पडले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
मालेगाव - मालेगाव येथील नियोजित कोविड सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच अनिता इंगोले, उपसरपंच मनोहर खंदारे, ईश्वर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार सुरजीत नरहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे, तलाठी पाटील यांची उपस्थिती होती. सोमवारपासून सदर केंद्र सुरू होणार आहे.
पावसाने फळबागा उद्ध्वस्त
हिमायतनगर - तालुक्यातील मदनापूर येथे अवकाळी पावसामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आंबा, आवळा, संत्रा, कलिंगड आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने जायमोक्यावर जावून नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.
सॅनिटायझरची फवारणी
मांडवी - येथील ग्रामपंचायतच्या वतीने वर्दळीच्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. ग्रामसेवक आडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चव्हाण, वीरेंद्र सूर्यवंशी, शेखर राठोड, रमेश लोंढे, गजानन बावणे, सुनील तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले.
कुंडलवाडीत दंडात्मक कारवाई
कुंडलवाडी : संचारबंदीच्या काळात शहरात विनामास्क फिरणाऱ्या ११ जणांवर कुंडलवाडी पालिकेने दंडात्मक कारवाई केली. पालिका कर्मचारी प्रतीक माळवदे, जी. एस. पत्की, सुभाष निरावार, मारोती करपे, हेमचंद्र वाघमारे, प्रकाश भोरे, शंकर जायेवार, पोलीस कर्मचारी गजानन अनमुलवार, पी. एस. बेग, शेख नजीर आदी उपस्थित होते.
कोविड जनजागृती मोहीम
हदगाव - तालुक्यातील रूई धानोरा येथे कोविडविषयी जनजागृती मोहीम सुरू आहे. घरोघरी जावून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. कोविडची लक्षणे आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात जावे, कुठलाही आजार अंगावर काढू नये, असे आवाहन ग्रामसेवक आर. जी. गुडूप, अशोकराव कदम आदी करत आहेत. नागरिकांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देणे सुरू केले आहे.
प्रतिबंधक फवारणी
देगलूर - तालुक्यातील येरगी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बागेवाड, सुरेश सोमावार, अशोक बरसमवार, मारोती बरसमवार, बसवंत चेंडके, सायलू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
ऑक्सिजन बेड वाढवा
बिलोली - येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या वाढवून रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बालाजी शिंदे यांनी संबंधितांकडे केली आहे. निवेदनाच्या प्रती त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चार शेळ्या लंपास
नायगाव - नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील बाबू राठोड यांनी घरासमोरील तीन पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधल्या होत्या. १७ एप्रिलला पहाटे सदर शेळ्या चोरून नेण्यात आल्या. याप्रकरणी कुंटूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
तरुणाची आत्महत्या
हदगाव - तालुक्यातील डोंगरगाव येथील नामदेव मारोती मिसाळ (वय ३५) यांनी विषा पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. हदगाव पोलिसांनी याघटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.