माहिती न देणाऱ्या ग्रामसेवकाला २५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST2021-02-23T04:27:09+5:302021-02-23T04:27:09+5:30
हासापूर येथील नागरिक गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत १८ ऑक्टोबर २०१७ ते २३ एप्रिल २०१८ या कालावधीत ...

माहिती न देणाऱ्या ग्रामसेवकाला २५ हजारांचा दंड
हासापूर येथील नागरिक गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत १८ ऑक्टोबर २०१७ ते २३ एप्रिल २०१८ या कालावधीत विविध कामांची माहिती मागितली होती. त्यामध्ये स्मशानभूमी, घरकुल योजना तसेच मासिक बैठकीच्या ठरावाची प्रत मागितली होती. मात्र ग्रामसेवक कानोडे यांनी वेळेत माहिती दिली नाही. त्याविरोधात प्रथम अपील सोनटक्के यांनी नांदेड गटविकास अधिकाऱ्यांकडे केले होते. त्यांनी माहिती देण्याचे आदेश पारित केले. मात्र त्यानंतरही ग्रामसेवक कानोडे यांनी माहिती दिली नाही. अखेर सोनटक्के यांनी राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त दिलीप धारूरकर यांनी माहिती मागवलेल्या पाचही प्रकरणात आयोगाने आदेशित करूनही माहिती न देणे व आदेशाची अवहेलना केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवक कानोडेला प्रत्येक प्रकरणात ५ हजार रुपये शास्ती जमा करण्याचे आदेश दिले. ही रक्कम जमा करून घेण्याची जबाबदारी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर निश्चित केली आहे.