ग्रा.पं.निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:26+5:302020-12-29T04:16:26+5:30

ग्रा.पं. निवडणूक बिनविरोध करा -आ. अंतापूरकर बिनविरोध होणाऱ्या ग्रा.पं.ला ५ लाख रुपयांचा निधी बिलोली : गावात एकोपा कायम ...

G.P. election | ग्रा.पं.निवडणूक

ग्रा.पं.निवडणूक

ग्रा.पं. निवडणूक बिनविरोध करा -आ. अंतापूरकर

बिनविरोध होणाऱ्या ग्रा.पं.ला ५ लाख रुपयांचा निधी बिलोली : गावात एकोपा कायम राहून गावचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन आ. रावसाहेब अंतापूरकर यांनी केले असून, तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विकासकामांसाठी ५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १५ जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. होणाऱ्या निवडणुकीत गावातील वातावरण चांगले राहावे, एकोपा राहावा, सर्वांच्या सहकार्याने विकास साधला जावा व अनावश्यक होणारा निवडणुकीचा खर्च टाळता यावा यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून गावाच्या निवडणुका या बिनविरोध झाल्यास फारच चांगले होणार आहे. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील अशा ग्रामपंचायतींना विकासात्मक कामासाठी स्थानिक विकास निधीतून ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आ. रावसाहेब अंतापूरकर यांनी सांगितले.

------------------------

कासराळी पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत

तीन हजार पशूंना लाळ-खुरकुत लस

कासराळी - श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखाना असलेल्या कासराळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत 3 हजार पशूंवर लाळ-खुरकुतचे लसीकरण करण्यात आले.

येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कानडखेडकर यांनी या लसीचा पशू मालकांना होणारा लाभ पशू मालकांना पटवून सांगितला. यासंबंधी दवाखाना क्षेत्रात मोठी जागृती केली. जवळजवळ तीन हजार पशूंवर पशू मालकांच्या दारी जाऊन लसीकरण केले आहे. कासराळीसह, रुद्रापूर, डोणगाव, बेळकोणी बु., बेळकोणी खु., भोसी आदी गावांतील पशू मालकांच्या पशूंना लाभ झाला आहे. याशिवाय येथे असलेल्या गोशाळेतील पशूंनाही याचा लाभ झाला आहे. डॉ. संतोष कानडखेडकर यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांची त्यांना याकामी मदत मिळाली.

------------------------------------------------------------------------------------------------

बेळकोणीत लाभार्थ्यांच्या भूमिकेमुळे पुरवठा विभागासमोर पेच

आठ दिवस उलटूनही चारशेहून अधिक लाभार्थ्यांनी धान्याकडे फिरविली पाठ

कासराळी - बेळकोणी बु. येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात सातत्याने होणाऱ्या तक्रारी, निवेदनाचे पडसाद आता धान्य वाटपावेळी उमटले. ५२७ लाभार्थ्यांपैकी चारशेहून अधिक लाभार्थी आठ दिवस उलटूनही दुकानाकडे फिरकलेच नाहीत. धान्याकडे लाभार्थ्यांनी सपशेल पाठ फिरविली असल्याने पुरवठा विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.

बिलोली तालुक्यातील बेळकोणी बु. येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात बेळकोणीतील तीनशेहून अधिक लाभार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून सामूहिकपणे तक्रारी, निवेदने उपोषणे करून सातत्याने उघडपणे भूमिका घेतली. राजेंद्र डाकेवाड यांच्यासह अनेकांनी पुरवठा विभागाला निवेदने देऊन पाठपुरावा केला. याविरोधात उपोषणदेखील केले. पुरवठा उपायुक्तांच्या निर्णयाने या दुकानदाराला पुन्हा दुकान मिळाले. त्याआधारे सदर दुकानदाराने बेळकोणी बु. येथील रेशन दुकानाचे धान्य वाटप सुरू केले.

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयात दुकानदाराविरोधात डाकेवाड यांनी केलेल्या अपिलाची सुनावणी बाकी असल्याने सुनावणी होईपर्यंत सदर रेशन वाटपाचे काम या दुकानदाराला देण्यात येऊ नये, अशी भूमिका निवेदकांकडून घेण्यात आली. मात्र उपायुक्तांच्या निर्णयाने सदर दुकानदार आज वैध आहे आणि त्यामुळेच दुकानदार हा रेशन वाटपास पात्र आहे, अशी भूमिका स्थानिक पुरवठा विभागाने घेतली. सध्या या दुकानदाराकडूनच बेळकोणी बु. येथे रेशन वाटप आठ दिवसांपासून सुरू असले तरी आजतागायत केवळ १२३ लाभार्थ्यांनी या दुकानदाराकडून रेशनचे धान्य घेतले. येथे अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएलचे ५२७ लाभार्थी आहेत. त्यापैकी केवळ १२३ लाभार्थ्यांनीच धान्य घेतले. उर्वरित ४०० हून अधिक लाभार्थ्यांनी अपेक्षेप्रमाणे धान्य घेतलेच नाही. आठ दिवसांपूर्वीच येथील ३५० लाभार्थ्यांनी या दुकानदाराकडून धान्य घेणार नसल्याचे निवेदन तहसीलदारांना दिले होते. प्रत्यक्ष वाटपावेळी अगदी त्याची अपेक्षेप्रमाणे प्रचीती आली. १८ डिसेंबरपासून धान्यवाटप सुरू आहे. आजतागायत केवळ १२३ लोकांनीच धान्य घेतले. ४०० हून अधिक लोक धान्य घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने पुरवठा विभागासमोर आता पेच निर्माण झाला आहे. दुकानदाराकडून लाभार्थ्यांना धान्य घेऊन जाण्याच्या सूचना, विनंत्या लाभार्थ्यांकडून धुडकावल्या जात आहेत. एखाद्या दुकानदाराकडून धान्य न घेण्याची आणि प्रकरण इतके टोकाला जाण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल. एकूणच बेळकोणी बु. येथील स्वस्त धान्याचे प्रकरण शांत होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. पुरवठा विभाग सदर बाब आमच्या अखत्यारीतील नाही म्हणून आपल्या भूमिकेवर, तर लाभार्थीही धान्य न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. तब्बल नऊ दिवसांपासून ४०० हून अधिक लाभार्थ्यांनी या धान्याकडे पाठ फिरविली आहे.

‘दुकानदार हा उपायुक्तांच्या निर्णयाने आज वैध आहे. बेळकोणीच्या लाभार्थ्यांनी धान्यासंबंधी तक्रारी असल्यास कळवावे. मात्र, धान्य घ्यावे. ग्राहक धान्य घेत नाहीत म्हणजे त्यांना धान्याची गरज नसावी असाच त्याचा अर्थ होतो. - उत्तम निलावाड (नायब तहसीलदार), बिलोली.

Web Title: G.P. election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.