नांदेड : दिवसेंदिवस रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने विभागातील ९ रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांत या नऊ ट्रेनला २ अतिरिक्त सामान्य डबे जोडले जातील.
यामध्ये गाडी क्रमांक (२२७३१-२२७३२) हैदराबाद-मुंबई-हैदराबाद, गाडी क्रमांक (१२७०२-१२७०१) हैदराबाद-मुंबई-हैदराबाद, गाडी क्रमांक (१२७०७-१२७०८) तिरुपती-निजामुद्दीन-तिरुपती, गाडी क्रमांक (१२७१५-१२७१६) नांदेड-अमृतसर-नांदेड, गाडी क्रमांक (१२७२०-१२७१९) हैदराबाद-जयपूर-हैदराबाद, गाडी क्रमांक (१२७२८-१२७२७) हैदराबाद-विशाखापट्टणम-हैदराबाद, गाडी क्रमांक (१२७६०-१२७५९) हैदराबाद-तंबरम-हैदराबाद, गाडी क्रमांक (१२७९३-१२७९४) तिरुपती-निजामुद्दीन-तिरुपती आणि गाडी क्रमांक (२२७३७-२२७३८) सिकंदराबाद-हिसार-सिकंदराबाद या नऊ गाड्यांचा समावेश आहे.
३१ गाड्यांचा समावेशमागील वर्षी दक्षिण-मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यात ६ अप-डाउन ट्रेनला २६ अतिरिक्त डबे जोडले आहेत. दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत २५ ट्रेनला अतिरिक्त ८० डबे जोडले होते. नववर्षात रेल्वे विभाग ९ ट्रेनला अतिरिक्त डबे जोडण्याच्या विचाराधीन आहे.
निरंतर प्रक्रियाप्रवाशांना सोयीस्कर रेल्वे प्रवास सुविधा प्रदान करण्यात दक्षिण-मध्य रेल्वे नेहमीच आघाडीवर आहे. प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त डबे वाढवणे ही एक गतिमान आणि निरंतर प्रक्रिया आहे. सामान्य लोकांच्या रेल्वे प्रवासाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, भारतीय रेल्वेने सर्व नॉन प्रीमियम एलएचबी डब्यांवर सामान्य डब्यांची संख्या २ वरून ४ डब्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण-मध्य रेल्वेत ४० रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.