‘सत्यदास’ने बनविले गर्भश्रीमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:34 IST2018-02-10T00:33:46+5:302018-02-10T00:34:10+5:30
५७ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत नाट्यभारती, इंदोरच्या वतीने शुक्रवारी मनोज महाजन लिखित श्रीराम जोग दिग्दर्शित ‘सत्यदास’ हे नाटक सादर झाले. दिवसरात्र यांच्या मिलनातून वेळ जन्माला येते. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा त्याचा उपयोग घ्यावा असा संदेश नाटकातून देण्यात आला़

‘सत्यदास’ने बनविले गर्भश्रीमंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ५७ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत नाट्यभारती, इंदोरच्या वतीने शुक्रवारी मनोज महाजन लिखित श्रीराम जोग दिग्दर्शित ‘सत्यदास’ हे नाटक सादर झाले. दिवसरात्र यांच्या मिलनातून वेळ जन्माला येते. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा त्याचा उपयोग घ्यावा असा संदेश नाटकातून देण्यात आला़
एक गरीब किराणा दुकानदार रघुनाथ ( श्रीराम जोग ) आणि त्याची पत्नी यमुना (प्रतीक्षा बेलसरे ) यांच्या लग्नाला अनेक वर्षे होऊनसुद्धा त्यांना मूलबाळ नसते. एके दिवशी त्यांच्या घरी वृद्ध सत्यदास (विकास डीडोरकर) आसरा मागायला येतो. तो एक रात्र राहतो आणि निघून जातो. तो गेल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा आढळतात. रघुनाथ त्या सोन्याच्या मोहरा सत्यदासला परत देण्यासाठी त्याचा शोध घेतो; पण यमुना त्या मोहरा परत देण्यास तयार नसते. ती म्हणते त्या सर्व मोहरा विकून मोठे किराणा दुकान उभे करु़ यमुना स्वत:साठी दागिने बनविते़ अशातच दिवाळीला सत्यदास पुन्हा परत येतो. त्याला पुन्हा एक दिवसाचा आश्रय हवा असतो. रघुनाथ आणि यमुना चिंतेत पडतात़ सर्व वैभव परत केल्यास आपण पुन्हा गरीब होवू म्हणून यमुना सत्यदासास मारण्याचा विचार करते; पण रघुनाथ विरोध करतो. दुसºया दिवशी तो सत्यदासास विचारतो की तू याआधी इथे काही विसरलास का? पण तो न बोलता निघून जातो. यावेळेस सत्यदास ज्या ठिकाणी झोपला होता तिथे त्यांना गर्भधारणेची जडीबुटी मिळते. यावर रघुनाथ यमुनास म्हणतो आधीची संधी मला कळाली नाही आणि आताची तुला कळाली नाही़ आधी सत्यदासाने आपणास श्रीमंत बनवले आणि आता गर्भ श्रीमंत. या नाटकात अनंत मुंगी, प्रफुल्ल जैन, श्रीरंग डीडोळकर, सुवर्णा गोडबोले, अरुण खळे, स्वानंद डीडोळकर, लोकेश निमगावकर, अनिरुद्ध किरकिरे, जय हाडीर्या, शुभम लोकरे, अमोध किरकिरे, संस्कृती बेलसरे, हिरण्यमयी, किरकिरे यांनी भूमिका साकारल्या.