मोफत पाठ्यपुस्तके यंदा विलंबाने मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:22+5:302021-06-03T04:14:22+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना पुढील वर्गात बढती देण्यात आली. १४ जूनपासून शैक्षणिक वर्षे ...

मोफत पाठ्यपुस्तके यंदा विलंबाने मिळणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना पुढील वर्गात बढती देण्यात आली. १४ जूनपासून शैक्षणिक वर्षे २०२१-२०२२ ला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने सर्व शाळांना पूर्वतयारी करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. दरवर्षी १५ मेपर्यंत पहिली ते आठवीपर्यंत मुला-मुलींसाठी देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, शैक्षणिक सत्र सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक आहेत, तरीही पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नाहीत.
कोरोना संसर्गामुळे यंदा पाठ्यपुस्तकांची छपाई उशिरा सुरू झाल्याची माहिती असून, ऑगस्ट महिन्याअखेर पुस्तकांची छपाई पूर्ण होऊन त्यांचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्ष पाठ्यपुस्तकाविना सुरू करण्याचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करण्याची उत्सुकता असली तरीही त्यावर कोरोनाचे सावट असणार आहे.
चौकट--------------
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पाठ्यपुस्तकांची छपाई उशिराने सुरू झाली आहे. सर्व शाळांतील मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी थोडा विलंब होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी सर्व पालकांनी व मुलांनी आपल्याकडील जुनी पाठ्यपुस्तके शिक्षकांच्या मदतीने शाळेत जमा करावीत. शाळा स्तरावर जमा झालेली चांगल्या अवस्थेतील पुस्तके शिक्षकांनी मुलांना वितरित करावीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
-दत्तात्रय मठपती,
उपशिक्षणाधिकारी