भारतीय संविधान प्रणालीतूनच नवसमाजाची निर्मिती - उपराकार लक्ष्मण माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST2021-04-12T04:16:28+5:302021-04-12T04:16:28+5:30
नांदेड : भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, विज्ञानवाद आणि समाजवाद यावर आधारलेल्या समताधिष्ठित तत्वज्ञानातूनच भारतीय संविधानाची निर्मिती ...

भारतीय संविधान प्रणालीतूनच नवसमाजाची निर्मिती - उपराकार लक्ष्मण माने
नांदेड : भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, विज्ञानवाद आणि समाजवाद यावर आधारलेल्या समताधिष्ठित तत्वज्ञानातूनच भारतीय संविधानाची निर्मिती झाली. ज्या संस्कृतीने जन्मतःच माणसांची वर्ण, अवर्ण, अस्पृश्य, आदिवासी, गुन्हेगारी जमात अशी वर्गवारी केली; अशा संस्कृतीला मूठमाती देऊनच भारतीय संविधान प्रणालीतूनच नवसमाजाची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले.
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित सातदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी पहिले उद्घाटकीय पुष्प गुंफताना ‘बाबासाहेबांचे संविधान राष्ट्र कोणासाठी?’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, डॉ. प्रकाश राठोड, अशोक बुरबुरे, संजय मोखडे, भय्यासाहेब गोडबोले, सज्जन बरडे, प्रशांत गवळे आदी उपस्थित होते.
माने म्हणाले, या देशातील वर्णवादी धर्मव्यवस्था ग्रंथप्रामाण्यवादी आहे. या व्यवस्थेच्या शिक्षणपद्धतीमुळे शिकलेल्यांचे ब्राह्मणीकरण झाले. शुद्रातिशुद्रांसह स्त्रियांनाही व्यक्तिस्वातंत्र्याचा दर्जा, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद, निर्णयक्षमता ही बाबासाहेबांची देण आहे. समताधिष्ठित समाज हे बाबासाहेबांचं स्वप्नं होतं. संविधानद्रोही लोकांच्या हातात आज सत्ता आहे. त्यामुळे संविधानाची तोडमोड सुरू आहे. इथले पिढ्यानपिढ्यांचे हक्कवंचित राज्यकर्ते बनले तरच भारत हे संविधान राष्ट्र बनू शकते. बाबासाहेबांचे संविधान राष्ट्र त्यांच्यासाठीच आहे, असेही ते म्हणाले.
महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर या कार्यक्रमात पिराजी भालेराव, सुनील खांडेकर, श्रीमंत बनसोडे, शिलवंत डोंगरे, महेंद्र मुन्नेश्वर, आवेश वासनिक, चंद्रकांत बोकेफोडे, शैलेश बागुल, विशाल वाळके, उषा नगराळे, सत्यजित साळवे, आदींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महामंडळाचे पदाधिकारी अरविंद निकोसे, डॉ. सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अमृत बनसोड, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे आदींनी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.
चौकट....
मोदींनी देश विकायला काढला!
पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वच सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण सुरू केले आहे. मोदींनी देशच विकायला काढला आहे. ही संघवादी मानसिकताच आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून त्यांना देशावर मनुवाद लादायचा आहे, असे लक्ष्मण माने म्हणाले. त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, शेजारी राज्यात कोरोना आढळत नाही, बंगालमध्ये निवडणुका होतात, सभा होतात, शेतकऱ्यांचे आंदोलनही मोठ्या संख्येने सुरू असते. मग कोरोनाची महामारी महाराष्ट्रातच आहे का? असा प्रश्न उपस्थित करून कोरोनाची भीती हे भांडवलदारांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.