Father dies ... Lockdown leaves work; The young man ended his life in a dilemma over how to run home | वडील वारले...लॉकडाऊनमुळे काम सुटले; घरगाडा कसा चालवायचा या विवंचनेतून तरुणाने जीवन संपवले

वडील वारले...लॉकडाऊनमुळे काम सुटले; घरगाडा कसा चालवायचा या विवंचनेतून तरुणाने जीवन संपवले

ठळक मुद्देतरुणाच्या जाण्याने कुटुंब आले उघड्यावरगरीबीने मांडली थट्टा; आईने फोडला हंबरडा

हिमायतनगर (जि़नांदेड) : सहा महिन्यापूर्वी वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाचा भार खांद्यावर पडला़ त्यातच कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागल्याने रोजगाराचा प्रश्नही सतावत असल्याने अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या विवंचनेतून येथील बजरंग चौक परिसरातील माधव श्रावण हातमोडे या २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी घडली़ 

हिमायतनगर शहरातील बजरंग चौक परिसरात २३ वर्षीय माधव श्रावण हातमोडे आपल्या आईसह भाऊ आणि बहिणीसोबत राहत असे़ शनिवारी सकाळी हिमायतनगर-सिरंजनी रस्त्यालगत एका शेतातील लिंबाच्या झाडाला झोक्याच्या दोरीने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले़ मागील काही दिवसापासून तो विवंचनेत होता असे मयत माधव यांच्या आईने सांगितले़

माधव हातमोडे याचे कुटुंब भूमीहीन असून एका छोट्याशा जागेत कुडाच्या घरात त्याचे वास्तव्य होते़ घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची कुटूंबाचा उदरनिर्वाह माधवच्या रोजमजूरीवरच अवलंबून होती़ सहा महिन्यापूर्वी माधवच्या वडिलांचे निधन झाले़ त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार माधववरच पडला होता़ काही महिन्यापूर्वीच तेलंगणातील निझामाबाद येथे तो मजुरीच्या कामासाठी गेला होता़ पैशाची जमवाजमव करून त्याने कसेबसे बहिणेचे लग्नही उरकले़ मात्र याच दरम्यान कोरोनाचे संकट आले़ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागल्याने माधवची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली़ त्यामुळे निजामाबाद येथील मजुरीचे काम सोडून तो गावी परतला़

गावाकडे आल्यानंतर त्याला १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले़ या कालावधीत हाताशी असलेले पैसेही खर्च झाले़ क्वारंटाईन कालावधीबरोबरच सोबतचे पैसेही संपले होते़ त्यातच बाहेर कामही मिळत नसल्याने आता कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न त्याला सतावित होता़ हाताला काम नसल्याने कुटुंबाचा घरगाडा चालवायचा कसा हा प्रश्न सतावत होता़ याच विवंचनेतून त्याने शनिवारी सकाळी  हिमायतनगर जवळील सिरंजनी रस्त्यालगत असलेल्या खदानीजवळी  लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली़ त्यानंतर मयताच्या प्रेताची  उत्तरीय तपासणी झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला़

गरीबीने मांडली थट्टा; आईने फोडला हंबरडा
माधवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच बजरंग चौक परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ तोपर्यंत ही माहिती माधवची आई धुरपतबाई हातमोडे यांना समजताच त्यांनी एकच हंबरडा फोडला़  धुरपतबाई म्हणाल्या की, शुक्रवारी कामाला जातो म्हणून माधव घराबाहेर पडला होता़ रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली, मात्र तो आला नाही़  आणि सकाळीच त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली. गरिबीने आमची थट्टा मांडल्याचे हताश उद्गार त्यांनी यावेळी काढले़ दरम्यान माधवच्या जाण्याने त्याचे कुटुंब निराधार झाले आहे़ शहरातील दानशूरांनी कुटुंबियाच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, तसेच शासनानेही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी गजानन मुत्तलवाड यांनी केली आहे़

Web Title: Father dies ... Lockdown leaves work; The young man ended his life in a dilemma over how to run home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.